Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआकाशी झेप घे रे पाखरा...

आकाशी झेप घे रे पाखरा…

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

जगात कोणत्याही माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर अधिकार चालत नाही. कुठे जन्म घ्यावा, हे आपल्या हातात नसतं, तसंच कधी मरावं, हेही आपल्या हातात नसतं. पण जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा प्रवास, ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ते आयुष्य कसं जगावं, हे मात्र बऱ्याच वेळा आपल्या हातात असतं.

एक गोष्ट सांगतो, एका गावात एका घराजवळ एक सरळसोट वाढलेलं एक उंच झाड होतं. त्याच्या शेंड्यावर एका गरुडानं घरटं वसवलं होतं. त्या घरट्यात गरुडाच्या मादीनं अंडी घातली होती. एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला. हां हां म्हणता ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. वारा-पावसाचं एक भयाण थैमान सुरू झालं. विजा लखलखू लागल्या. ढग गडगडू लागले आणि अचानक या उंच झाडावर वीज कोसळली. झाड उन्मळून, दुभंगून खाली कोसळलं. त्या गरुडाचं घरटंही मोडलं, अंडी खाली पडली. फुटली.

पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या न्यायानं एक अंड मात्र खाली पाचोळ्यावर पडलं आणि बचावलं.
दुसऱ्या दिवशी वादळ शमल्यानंतर तिथं दाणे टिपणाऱ्या एका कोंबडीला ते अंडं दिसलं. तिनं आपल्या अंड्याबरोबरच ते गरुडाचं अंडंही उबवलं आणि कालांतराने त्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर पडलं. गरुडाचं पिल्लू… कोंबडीने त्या गरुडाच्या पिल्लाला आपल्याच पिल्लांसोबत प्रेमानं वाढवलं आणि ते पिल्लूदेखील इतर कोंबडीच्या पिल्लांप्रमाणेच उकिरड्यावर पडलेले दाणे टिपू लागलं. थोडं इकडे, थोडं तिकडे उडू लागलं. पॅक पॅक क्वॅक क्वॅक करून धावू लागलं…

दिवस-रात्रीचं कालचक्र सुरूच होतं. दिवस सरले. महिने उलटले. वर्षं सरली आणि हां हां म्हणता, त्या पिल्लाचं रूपांतर एका मोठ्या गरुडात झालं, पण तरीही तो गरुड त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसार त्या कोंबडीच्या इतर पिल्लांतच खेळण्यात धन्यता मानत होता. उकिरड्यावर मिळालेले दाणे अळ्या आणि किडे खाऊन पोट भरण्यात धन्यता मानत होता.

एके दिवशी उकिरड्यावर दाणे टिपताना, एक भली मोठी सावली जमिनीवरून सर्रकन जाताना त्याने पाहिली. ही एवढी मोठी सावली कुणाची असा विचार करून त्याने आकाशात पाहिलं. वर एक भलामोठा गरुड घिरट्या घालत होता. त्या पिल्लानं त्याच्या आईला म्हणजेच त्या कोंबडीला विचारलं,

‘आई, कोण गं हा पक्षी? केवढा मोठा आहे नाही? अन् किती उंचावरून उडतोय गं…?’
ती कोंबडी हसली आणि म्हणाली की,
‘अरे हा पक्षी म्हणजे सर्व पक्षांचा राजा गरुड… आणि बरं का बाळा, तू सुद्धा एक गरुडच आहेस. तू सुद्धा अगदी तसाच उंच उडू शकतोस, तशीच भरारी घेऊ शकतोस…’
‘छट् काही तरीच काय सांगतेस?’ त्या गरुडाच्या सुरात आश्चर्य आणि भीती होती.
‘अरे खोटं नाही सांगत. खरोखरच तू गरुड आहेस. तू स्वतःच स्वतःकडे बघ ना. माझ्यापेक्षा, तुझ्या इतर भावंडांपेक्षा तू किती वेगळा आहेस. तुझी चोच बघ. तुझे पाय बघ, तुझे पंख बघ… तू कोंबडा नाहीस रे राजा. तू गरुड आहेस. तुला उंच उंच उडता येऊ शकतं, तू देखील आकाशात भरारी मारू शकतोस.’

‘नाही आई मला शक्य नाही गं.’
‘अरे प्रयत्न तर करून बघ…’
‘नाही गं मला भीती वाटते. मी इतक्या उंचीवरून पडलो, तर मी मरून जाईन आणि काय करायचंय इतकं उंच उडून? मला जे हवं, ते अन्न या उकिरड्यावर मिळतंय की…’
‘अरे पण…’

कोंबडीने त्या पिल्लाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो गरुड ऐकायलाच तयार नव्हता. कशाला उगाचच एवढा धोका पत्करायचा आणि काय मिळणार आहे, उंच भरारी मारून? आहे हा उकिरडा काय वाईट आहे? असा सामान्य विचार करून, तो गरुड त्याच उकिरड्यावर कोंबड्यासारखाच राहिला आणि म्हातारा होऊन कोंबड्यासारखाच कधीही भरारी न मारता मरून गेला.

उकिरड्यावर खुरडत दाणा-पाणी टिपणारे असे अनेक गरुड मी स्वतः पाहिले आहेत. तुम्हीही पाहिले असतील.
जे मिळालं आहे, त्यात समाधान मानून स्वतःची क्षमता वाया घालवणारे, स्वतःच्या कुवतीची नेमकी कल्पना नसल्यामुळे, आयुष्य नासवून घेणारे अनेक तरुण आपण पाहतो.

गाव सोडून शहरात गेला असता, तर मोठा नट झाला असता, असे कोकणातील अनेक दशावतारी नट… केवळ गावच्या नाटकात कामं करीत राहतात.

चार भिंतींच्या आत न राहता, बाहेर पडून कॅटरिंग केलं असतं, तर अनेक जणांच्या रसना तृप्त झाल्या असत्या. लोकांना नवनवीन पदार्थ खायला मिळाले असते, अशा गृहिणी माझ्या ओळखीच्या आहेत.

शाळेच्या समारंभापुरतं पेटी वाजवणारे, गाणारे अनेक गायन मास्तर, घरगुती सण समारंभापुरतेच कार्यक्रम करणारे अनेक नकलाकार, जादूगार ही सर्व मंडळी गरुडाचीच पिल्लं असतात. केवळ त्यांना आपल्या कुवतीची जाण नसते.
कसली तरी अनामिक भीती आणि अल्पसंतुष्टता यांच्यामुळे त्यांचे पंख बांधले जातात. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ ही अल्पसंतुष्ट पांढरपेशी वृत्ती त्यांच्या रक्तात भिनलेली असते.

सुदैवाने आता पूर्वीसारखी संकुचित परिस्थिती राहिलेली नाही. दूरदर्शनसारख्या माध्यमातून बरीच नवनवीन दालनं खुली झाली आहेत. शिक्षणासाठी आता ‘गरीब परिस्थिती’ हे एकमेव कारण पुढे करता येणार नाही. अनेक शैक्षणिक संस्था, बँका अशा गरुडांना उडायला प्रवृत्त करत आहेत. नवं आकाश, नवी क्षितिजं दररोज निर्माण होत आहेत. या सगळ्या संधीचा लाभ घ्यायलाच हवा.

आपल्याही ओळखी-पाळखीत असा एखादा गरुड आहे का, याचा शोध घ्यायला हवा. असेल तर गरुडाच्या पिल्लाला उकिरड्यातून बाहेर काढायला हवं. तो स्वतःहून बाहेर पडायला तयार नसेल, तर थोडीफार जबरदस्तीही करायला हरकत नाही. त्याला चुचकारून, लालूच दाखवून कसंही करून… पण कोणत्याही परिस्थितीत त्याला उडायला प्रवृत्त करायला हवं आणि इतरांचं कशाला आपणही स्वतः कधी तरी मनाच्या आरशात डोकावून पाहूया. तिथंही कदाचित आपल्याला एक गरुड दिसेल. आजवर खुराड्यात राहिलेला. उकिरड्यावर दाणे टिपत पॅक पॅक करणारा. खुल्या आकाशाची भीती बाळगणारा.

ही स्वतःची भीती स्वतःच दूर करूया. टप्याटप्यानं उडायला शिकूया. सुरुवातीला अडखळणं धडपडणं झालं, तरी नंतर नक्की जमेल…

असीम निळ्या आकाशात भरारी मारताना मिळणारा असीम आनंद हा प्रत्येक गरुडाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. आणि गरुडानं उडणं नाकारून, उकिरड्यावर खुरडत राहणं, हा गरुड म्हणून जन्माला घालणाऱ्या त्या परमेश्वराचा अपमान आहे…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -