Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाIPL 2024 : इंग्लंडच्या खेळाडूंचा 'हा' प्रकार पाहून सुनील गावस्करांचा चढला पारा!

IPL 2024 : इंग्लंडच्या खेळाडूंचा ‘हा’ प्रकार पाहून सुनील गावस्करांचा चढला पारा!

काय आहे प्रकरण?

मुंबई : सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलची (IPL) हवा आहे. कोणता संघ बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, या दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (England Cricket Board) एका आदेशामुळे भडकले आहेत. या क्रिकेट बोर्डावर दंडात्मक कारवाई करण्याचा सल्लाही त्यांनी बीसीसीआयला (BCCI) दिला आहे. याचं कारण म्हणजे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी २० वर्ल्डकप खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना आयपीएल सोडून लवकर मायदेशी परतण्यास सांगितले आहे. त्यामुळे गावसकर यांनी आयपीएलचा हंगाम लवकर सोडणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे.

काही आठवड्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जे खेळाडू टी २० वर्ल्डकप संघात निवडले गेले आहेत त्यांना २२ मे पूर्वी मायदेशात दाखल होण्यास सांगितले होते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी २० मालिका होणार आहे. त्यासाठी या सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलवण्यात आलं आहे. मात्र, यामुळे आयपीएलचे नुकसान होणार आहे. यावर सुनील गावस्कर यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

सुनिल गावसकर म्हणाले की, ‘मी देशाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे समर्थन करतो. मात्र खेळाडूंनी फ्रेंचायजींना संपूर्ण हगामासाठी त्यांच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त केले आणि आता ते माघार घेत आहेत, यामुळे फ्रेंचायजीचं नुकसान होत आहे. फ्रेंचायजी हे त्यांना एका हंगामासाठी एवढे पैसे देतात की तेवढे पैसे ते देशाकडून काही हंगाम खेळले तरी मिळवू शकत नाहीत.’

ते पुढे म्हणाले की, ‘फ्रेंचायजीने अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापून घ्यावी. याचबरोबर क्रिकेट बोर्डांना त्यांचे १० टक्के कमिशन देखील देण्यात येऊ नये. जर बोर्ड आश्वस्त करून माघार घेत असतील तर त्यांना देखील दंडीत केलं पाहिजे. खरं सांगायचं तर क्रिकेट बोर्डांना प्रत्येक खेळाडूमागे १० टक्के कमिशन हे फक्त आयपीएलमध्येच दिले जाते. जगात इतर कोठेही असं केलं जात नाही. बीसीसीआयच्या या उदारपणाचे कोणी आभार मानतं का? नाही नक्कीच नाही’, अशा प्रकारे गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -