ते म्हणतात ना हाताच्या काकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष स्पष्ट असणाऱ्या गोष्टीस पुरावा नको असतो हे या कथेतून स्पष्ट होते.
कथा – रमेश तांबे
रामभाऊने त्याच्या शेतात कांदे लावले होते. यावेळी कांद्यातून आपण चांगले पैसे मिळवायचे, असा विचार त्याने केला होता. पण एक अडचण होती, ती म्हणजे दिवसभर वीज नसायची. रात्रीचे १० वाजले की, विहिरीवरचा पंप चालू करावा लागे. कष्ट करायची त्याची तयारी होतीच; पण भीती होती वाघाची! रामभाऊंचा तालुका तसा सधन. भरपूर पाण्याचा, हिरव्यागार शेतमळ्यांचा आणि त्यातही हमखास पैसा मिळवून देणाऱ्या उसाचा! उसाचे क्षेत्र जास्त असल्याने, रामभाऊंचा तालुका बिबळ्यांसाठी अक्षरशः नंदनवनच होता.
तालुक्यात रोज बातम्या यायच्या. आज काय तर कोणाची गाय मारली, तर कोणाचं बकरू पळवून नेलं. गावातली भटकी कुत्रीसुद्धा दिसेनाशी झाली होती. गेल्या दोन-चार महिन्यांत बिबळ्याने माणसांवरच हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामुळे गावात एक भीतीसदृश वातावरण होते. अंधार पडला की, सगळी लोकं दरवाजे, खिडक्या बंद करून घरात बसू लागली. पण इकडे रामभाऊंच्या जीवाला दुसराच घोर लागला होता. तो म्हणजे कांद्याला पाणी कसे द्यायचे? दिवसभर वीज नसते आणि रात्री वीज येते, तर तेव्हा बिबळ्यांची भीती! अशा कात्रीत रामभाऊ सापडला होता.
त्या रात्री रामभाऊंचे याच विषयावर बायकोबरोबर भांडण सुरू होते. रामभाऊला कांद्याला पाणी द्यायला जायचं होतं, तर त्याच्या बायकोचे म्हणणे होते, जळाला तर जळू दे कांदा! पण रात्रीच्या वेळी शेतात जायचं नाही. बिबळ्या केव्हाही झडप घालतो. पण रामभाऊ ऐकायलाच तयार नव्हता. बायकोशी भांडण करून, हातात काठी आणि बॅटरी घेऊन तो रात्री एकटाच बाहेर पडला अन् बॅटरीच्या उजेडात तो विहिरीची वाट चालू लागला.
काळ्याकुट्ट अंधारात सगळीकडे भरभर नजर फिरवत, रामभाऊ चालला होता. मनात एका बाजूला कांद्याची काळजी, तर दुसऱ्या बाजूला बिबळ्याची भीती. वातावरणात निरव शांतता होती. आकाशात चांदणं पडलं होतं. त्याचा अंधुकसा प्रकाश साऱ्या शिवारावर पडला होता. रामभाऊंच्या पावलांचा आवाज वातावरणातील शांतता भंग करत होता. थोड्याच वेळात रामभाऊ विहिरीजवळ पोहोचला. पंप चालू केला, तेव्हा त्याला जरा हायसे वाटले. त्याने कपाळावरचा घाम पुसला. तो थोडा वेळ विहिरीवरच बसला. आता सकाळपर्यंत पंप सुरूच राहणार होता. त्यामुळे त्याला कसलीच चिंता नव्हती.
रामभाऊंनी घराची वाट धरली. आता तो आधीपेक्षा अधिक सैल झाला होता. मनात कांद्याचे शेत त्याला भरपूर पैसे मिळवून देणार, याचाच विचार होता. डोक्यातून बिबळ्याचा विचार पार गेला होता आणि रामभाऊ बेसावध असतानाच, उसाच्या शेतात लपलेल्या बिबळ्याने अचानक रामभाऊंवर झेप घेतली. रामभाऊ गडबडला. तो धाडकन खाली कोसळला. हातातली काठी, बॅटरी कुठल्या कुठे उडाली. आता झटापट सुरू झाली. बिबळ्याची आणि रामभाऊंची! रामभाऊ तसा कसलेला गडी होता. पण बिबळ्या काही मागे हटत नव्हता. तेवढ्यात रामभाऊंचा उजवा खांदा बिबळ्याने तोंडात पकडला.
त्याचे अणकुचीदार सुळे रामभाऊच्या खांद्यात घुसले आणि वेदनेची एकच प्रचंड मोठी कळ रामभाऊंच्या अंगातून सळसळत गेली. आई गं! रामभाऊ कळवळला. आता मात्र रामभाऊंचे अवसान पार गळाले. आता सारे संपले, बिबळ्या आपला जीव घेणार, असेच रामभाऊला वाटू लागले. त्याची शक्ती क्षीण होऊ लागली. आपण बायकोचं ऐकायला हवं होतं. कांद्यापायी जीव जाणार, असं त्याला वाटू लागलं. पण काय आश्चर्य अचानक बिबळ्या जोरात ओरडला आणि रामभाऊला सोडून तिथून पळून गेला. त्या अंधारात रामभाऊला दिसले की, कोणी तरी बिबळ्याच्या पायावर जोरात प्रहार केला आहे. कारण बिबळ्या लंगडत-लंगडत रामभाऊंला सोडून गेला.
रामभाऊ उठला. त्याच्या उजव्या खांद्यातून रक्त येत होते. पण जीवावर बेतले असते, ते खांद्यावर निभावले, हे त्यातल्या त्यात बरेच झाले, असे त्याला वाटले. रामभाऊ समोर बघतो तर काय, हातात कोयता घेऊन बायको उभी होती, अगदी खंबीरपणे. एखाद्या रणरागिणीसारखी! तेव्हा कुठे रामभाऊच्या लक्षात आले की, आपले प्राण वाचवणारी दुसरी-तिसरी कोणी नसून, आपली बायकोच आहे. तो धावतच बायकोकडे गेला आणि म्हणाला की, “शेवंते तू होतीस म्हणून वाचलो बघ!” पण ती काहीच न बोलता, घराकडे निघाली अन् तिच्या मागे रामभाऊ चालू लागला, अगदी शांतपणे…!