Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलता­ऱ्यांचा प्रकाश

ता­ऱ्यांचा प्रकाश

कथा – प्रा. देवबा पाटील

यशश्रीसाठी परी म्हणजे ज्ञानाचे भांडार होते. म्हणून नेहमीप्रमाणे यशश्री ही उत्सुकतेने परीची वाट बघतच होती. तेवढ्यात परी तिच्याकडे आली. चहापाणी झाल्यानंतर दोघींच्या आकाशासंबधी गप्पा सुरू झाल्या.
“तारे स्वयंप्रकाशी कसे असतात परीताई?” यशश्रीने प्रश्न विचारला.

“हे तारे म्हणजे अतिशय उष्ण अशा वायूंचे खूप मोठमोठे गोळे असतात. त्यांचे तापमान अतिशय प्रचंड असते. त्यांच्या प्रचंड उष्णतेनेच तेजस्वी असा प्रकाश निर्माण होत असतो. असा त्यांना स्वत:चा प्रकाश असतो म्हणजे ते स्वयंप्रकाशी असतात,” परीने सांगितले.

“पण त्यांपैकी काही चमचम चमकतात, तर काही नुसते लुकलुकतात. खरे आहे ना परीताई?” यशश्रीने आपल्या बुद्धीची चमक दाखवित विचारले, “ते असे कसे दिसतात?” “हुशार आहेस बाळा तू व तुझे निरीक्षणही खूपच सूक्ष्म आहे,” परी सांगू लागली.

“पण मग त्यांचे चमचमणे, लुकलुकणे हे असे कमी-जास्त कसे होते?” यशश्रीने विचारले.
“तारे लुकलुकतात किंवा चमचमतात म्हणजे त्यांची चमक कमी-जास्त होते. बरोबर आहे तू म्हणते ते. या सा­ऱ्या ता­ऱ्यांचे तापमान हे वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यापासून निघणारा प्रकाशही कमी-जास्त असतो. तसेच त्यांचे अंतरही आपल्या ग्रहापासून वेगवेगळे व कमी-जास्त असते, म्हणून त्यांची चमकही आपणास कमी-जास्त दिसते. वास्तविकत: ता­ऱ्यांपासून निघणारा प्रकाश हा स्थिर असतो. आपल्या ग्रहाभोवती सतत बदलणारे असे वातावरणाचे, विविध माध्यमांचे काही थर आहेत. ता­ऱ्यांचा प्रकाश हा ग्रहांच्या मानाने खूप दुरून आपल्या ग्रहाकडे येत असतो; परंतु तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याला आपल्या ग्रहा सभोवतीच्या वातावरणातून मार्गक्रमण करीत
यावे लागते.”

परी पुढे सांगू लागली की, “पृथ्वीपासून जसजसे वर जावे, तसतसे विविध कारणांनी वातावरणाच्या वरच्या थरांचे तापमान सतत बदलत असते. हवेचे थर नेहमी वरखाली-खालीवर असे होत असतात. त्यामुळे वातावरण सतत अस्थिर असते. वातावरणातील हवेच्या थरात खालून वर व वरून खाली असे सतत एकसारखे चलन सुरू असते. वायुमंडलाच्या गतिमान थरातून येताना, ता­ऱ्यांचा प्रकाश थोडासा थरथरतो. हवेच्या अशा चलनामुळे हवेच्या थरांपलीकडील तारे आपणास लुकलुकताना दिसतात.”

“म्हणजे वातावरणात अतिशय उष्णता असताना सूर्याच्या उष्णतेने जमीन खूप तापते, तेव्हा हवेच्या हालचालीने दूरच्या वस्तू हलताना दिसतात. त्याप्रमाणे होते का हे परीताई?” यशश्रीने योग्य उदाहरणासह परीला विचारले. “बरोबर आहे यशश्री. तू खरोखच बुद्धिमान व अभ्यासू आहेस.” परी पुढे सांगू लागली की, “तारे खूप दूर असल्याने, त्यांचा प्रकाश अशा अस्थिर वातावरणातून पृथ्वीकडे येताना तो वेगवेगळे तापमान, निरनिराळी घनता असलेल्या व म्हणून वेगवेगळी वक्रीभवनशक्ती असलेल्या वायूंच्या थरांतून येतो. अशा अस्थिर थरांच्या वातावरणातून येताना प्रकाशकिरण वारंवार विचलित, वक्रीभवित आणि विकरीत होत असतात. म्हणजे प्रकाश वारंवार त्याच्या सरळ मार्गापासून थोडा थोडा वाकतो (वक्रीभवित), थोडा थोडा फाकतो (विकरीत), पुन्हा एकत्र येतो आणि पुन्हा वाकतो, फाकतो. त्यामुळे ता­ऱ्यांच्या प्रकाशकिरणांची तीव्रता कमी-जास्त (विचलित म्हणजे बदल) होते. त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात आणि त्यांच्या रंगाच्या छटाही बदलतात.”

“म्हणजे रात्री जे लुकलुकतात, ते तारेच असतात. ग्रह नसतात.” यशश्री बोलली.

“बरोबर, तारेच चमकताना लुकलुकतात, तर ग्रह स्थिरतेने चमकतात.” परी पुढे म्हणाली, “तारे लुकलुकताना दिसतात, तर ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. ग्रह सतत स्थिर चमकतात म्हणजे ग्रहांकडून येणारा प्रकाश हा बहुतांश स्थिर असतो. ता­ऱ्यांच्या मानाने ग्रह पृथ्वीपासून खूप जवळ आहेत. त्यांच्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तित किरणांवर वातावरणातील अस्थिरतेचा फारच कमी परिणाम होतो. म्हणून ते लुकलुकताना दिसत नाहीत. तसेच ता­ऱ्यांपेक्षा ग्रह पृथ्वीला जवळ असल्याने, ग्रहांपासून आपल्या डोळ्यांच्या बरोबर समोर असलेला कोन ता­ऱ्यांपासून असलेल्या कोनापेक्षा मोठा असतो. कोनांच्या विशालतेमुळे आपले डोळे ग्रहांच्या प्रकाशाचे वक्रीभवन शोधण्यास समर्थ नसतात म्हणून ते लुकलुकताना दिसत नाहीत.”

“यशश्री काल तुला थोडा जास्तीचा अभ्यास होता आणि आज मला एक महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे आपण आपल्या गप्पा आज येथेच थांबवू आणि राहिलेल्या ज्ञानगप्पा उद्या करू,”

परी म्हणाली.
“हो ताई. चालेल,” यशश्रीने सांगितले व परी आपल्या मार्गाने रवाना झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -