Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपुत्र बभ्रुवाहनाकडून अर्जुनाचा वध

पुत्र बभ्रुवाहनाकडून अर्जुनाचा वध

विशेष – भालचंद्र ठोंबरे

अर्जुनाला चार बायका होत्या. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा व नागकन्या उलूपी. सुभद्रेचा अभिमन्यू, चित्रांगदेचा बभ्रुवाहन व उलूपीचा ईरावन. महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर आप्तेष्टांच्या मृत्यूमुळे तसेच शिखंडीला समोर करून पितामह भीष्मांना ठार करणे व अन्य गुरुजन वर्गाच्या मृत्यूमुळे पांडवांना आत्मग्लानी व निराशेने घेरले. तेव्हा कृष्ण व महर्षी व्यासांनी त्यांना अश्वमेघ यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे यज्ञ करून अर्जुनाच्या संरक्षणात अश्व सोडण्यात आला. निरनिराळ्या राज्यातून जाणाऱ्या घोड्याचे काही राजांनी आदराने स्वागत करून पांडवांचे मांडलिकत्व पत्करले, तर युद्धाला उभे राहिलेल्याचा अर्जुनाने पराभव केला.

पुढे अश्व मणिपुरात आला. तेथे बभ्रुवाहन राज्य करीत होता. आपले वडील येत आहेत हे कळताच तो स्वागतासाठी नागरिक व आप्तेष्टांसह सीमेवर आला.

मात्र आपण सध्या महाराज युधिष्ठिराच्या आज्ञेने अश्वाच्या संरक्षणासाठी असून तू क्षात्र धर्माचे पालन करून युद्धास सज्ज व्हावयास पाहिजे तसे न करता तू अधर्मीपणाचे वर्तन करतोस असे म्हणून धिक्कार केला. हे ऐकून त्या ठिकाणी असलेल्या उलूपीने बभ्रुवाहनाला क्षात्रतेजाची जाणीव देऊन तुझ्या पराक्रमी पित्याला तू युद्ध केलेलेच आवडेल व त्यानेच ते प्रसन्न होतील असे सांगून युद्धास प्रवृत्त केले. ते ऐकून बभ्रुवाहन युद्धाला तयार झाला. दोघामध्ये घनघोर युद्ध होऊन बभ्रुवाहनाने अर्जुनाचा वध केला. अर्जुन मरण पावल्याचे ऐकताच चित्रांगदा युद्धभूमीवर येऊन शोक करू लागली.

उलूपीला दोष देत म्हणाली, तुझ्या चिथावणीवरून पितापुत्रांमध्ये युद्ध झाले तेव्हा अर्जुनाला जिवंत कर अन्यथा मी येथेच प्राणत्याग करेन. तेव्हा उलूपीने नागांना जिवंत करणाऱ्या संजीवनी मण्याचे स्मरण केले व तो नागमणी बभ्रुवाहनाला देऊन अर्जुनाच्या छातीवर ठेवण्यास सांगितले. बभ्रुवाहनाने तसे करताच अर्जुन जिवंत झाला. सर्वांना आनंद झाला पण पितापुत्रात भांडण लावणाऱ्या उलूपीला सर्व दोष देऊ लागले. तेव्हा तिने या मागील रहस्य उघड केले.

अश्वमेघाचा घोडा घेऊन गंगा काठाने जात असताना अर्जुनाला गंगेचे दर्शन घेऊन गंगापुत्राच्या वधाबद्दल क्षमा मागण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे गंगेकडे जाताच त्याठिकाणी वसू प्रकट झाले व तू आमच्या बंधूचा (भीष्माचा) हत्यारा असल्याने पापी आहेस व गंगा स्पर्श करण्यास योग्य नाहीस, असे म्हणून अटकाव केला. मात्र अर्जुनाने त्यांचा पराभव करून व त्यांना बंधक करून नदीकाठीच पडू दिले व गंगेची क्षमा मागून गंगाजल प्राशन करून पुढे निघाला. तेव्हा वसूंनी अर्जुनाला आमच्या भावाला (भीष्माला) कपटाने मारल्यामुळे तुलाही तुझ्या पुत्राकडून मरण येईल असा शाप दिला. हे सर्व ऐकूनच मी बभ्रुवाहनाला अर्जुनाशी लढण्यास प्रवृत्त केले व नंतर अर्जुनाला जिवंत केल्याचे रहस्योद्घाटन केले.

तात्पर्य : कळत-नकळत आपल्याकडून झालेल्या चुकीचे अथवा पापाचे परिणाम कृष्णासारखा सखा असूनही अर्जुनालाही भोगावेच लागले. हे लक्षात घेऊनच मानवाने आपले वर्तन ठेवावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -