Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजतेथे कर माझे जुळती...

तेथे कर माझे जुळती…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

नमस्कार मंडळी…

‘नमस्कार’ या चार शब्दांप्रमाणेच कृतीतही आपल्या संस्कारांचं प्रतिबिंब आहे. शब्द आणि कृती दोन्ही आदरणीय आहे. समोरच्या व्यक्तीचा आदर शब्दाने व कृतीने केला जातो. शालीनतेची कृती म्हणजे नमस्कार. कुठल्याही पत्राची सुरुवात नमस्काराने होते. तो शि. सा. न. असतो, स. न. वि. वि असतो व सप्रेमही असतो. व्यक्ती सापेक्ष बदलत जातो. पण भाव तोच असतो!

नमस्कार हा अनेक कृतीतून, अनेक भावातून साकारला जातो. आदरयुक्त सादरीकरणातून त्यातील भाव दर्शविला जातो. देवळाची पायरी चढण्यापूर्वी पहिल्या पायरीला वाकून उजव्या हाताने स्पर्शून तोच हात हृदयाला किंवा मस्तकाला स्पर्शीला जातो. हा पूर्ण भक्तिभाव! पुन्हा गाभाऱ्याच्या उंबरठ्याला स्पर्शून तीच क्रिया घडते. नंतर दोन्ही हात जुळवून देवापुढे उभे राहतो, मान झुकवतो, मस्तकाचा स्पर्श जोडलेल्या हातांना होतो. कधी देवासमोर गुडघे टेकवून, माथा देवाच्या चरणी टेकवतो, तर कधी साक्षात दंडवत असतो म्हणजे भक्तिरसाचा आविष्कार!

मंदिरासमोरून जाताना उजवा हात नकळत हृदयाकडे जातो. तेव्हा क्षणभर डोळे मिटले जातात. त्याशिवाय तिथून व्यक्ती पुढे जाऊच शकत नाही, अशी ही संस्कृती!

घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार केला जातो. मनापासून आशीर्वाद मिळतात. मुठीत खाऊ पण! आदरणीय व्यक्तीपुढे थोडं झुकून दोन्ही हात जोडून सन्मानपूर्वक नमस्कार केला जातो. संवादाची सुरुवात ‘नमस्कार’ या शब्दाने व कृतीने होते!

परीक्षेला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना, घरातील देवापुढे नमस्कार करून पेपर लिहिण्यास धैर्य दे, यश मिळू दे असे साकडं घातलं जातं. यश मिळाल्यावर, तू माझं ऐकलंस देवा… म्हणून जे हात जोडले जातात, त्यात पूर्णतः देवाचाच आशीर्वाद आहे, अशी श्रद्धा असते.

शास्त्रीय नृत्याला सुरुवात करताना, प्रथम जो नृत्याविष्कार केल्या जातो. ही वंदन करण्याची अप्रतिम कृती सादर केली जाते. कलाकार सुद्धा रंगमंचाला नमस्कार करूनच रंगमंचावर पाऊल ठेवतो, रंगदेवतेला वंदन करून!
लग्नातील वधू-वर मांडवात जोडीने सर्वांना वाकून नमस्कार करून सुखी संसारासाठी आशीर्वाद मागतात. यावेळी वधूच्या नमस्काराला बांगड्यांची किणकिण मंजुळ आवाजाची साथ असते. तो एक मंगल सोहळा असतो नमस्काराचा. मेंदीने रंगलेल्या हातांचा!

लहान बाळाला ‘जय जय बाप्पा ‘ करायला शिकवतो, तेव्हा त्याचे दोन गोंडस हात जोडले जातात, कपाळाला टेकवले जातात, चेहऱ्यावर आपसूकच हसू असतं. त्यावेळी सगळं जग जणू आपला कौतुक सोहळा बघतो आहे, असे भाव त्या निरागस चेहऱ्यावर असतात! आजकालची पिढी म्हणजे समोरील व्यक्तीच्या गुढघ्यापर्यंत एक हात नेऊन नमस्कार करतात. चला, हेही नसे थोडके!

चालता चालता कोणालाही, लहान असो, मोठे असो चुकून पाय लागला की लगेच चुकलो या भावनेनी नमस्कार केला जातो, एक हात स्पर्शून… त्यात एक विनम्र कृतीचा भाव असतो. पुस्तकाला चुकून पाय लागला, तर सरस्वतीचा अपमान व्हायला नको म्हणून बोटांनी स्पर्शून नमस्काराने माफी मागितली जाते. सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल, तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल व परिस्थिती ही!

कुठलेही महत्त्वाचे काम करताना, मनातल्या मनात नमस्कार केला जातो, एक आधार असतो, या नमस्कारामध्ये! काही जणांना मात्र कोपरापासून करण्याची वेळ येते, अशी आपली नमस्कारमय संस्कारप्रधान संस्कृती दोन हात जुळवून साकार होते.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती…
तेथे कर माझे जुळती!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -