Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिककिलबिललज्जतदार : कविता आणि काव्यकोडी

लज्जतदार : कविता आणि काव्यकोडी

आई म्हणते, मी दिसतो
मस्त गुटगुटीत
चवीचवीने खातो सगळे
तब्येत ठणठणीत

रसरशीत फळांचा मी
पाडतो फडशा राव
चटपटीत पदार्थांवरही
चांगला मारतो ताव

दिवाळीच्या फराळात हव
करंजी खुसखुशीत
सोबतीला हवी चटकदार
चकली कुरकुरीत

लुसलुशीत पुरणपोळी हवी
सणावाराला हमखास
घसघशीत तुपाची धार
त्यावर हवी खास

चमचमीत
मिसळीचा घेतो
आस्वाद अधूनमधून
चुरचुरीत अळूवडीसाठी
बसतो खूपदा अडून

मिळमिळीत जेवणाला
म्हणतो मात्र नाही
झणझणीत पिठलेसुद्धा
आवडीने मी खाई

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) शीर्षक, उपशीर्षक
ठळक अक्षरात
दिशादर्शक बाणही
दाखवतात त्यात

भौगोलिक घटक
अचूक त्यात असे
सांगा बरं कशात
सूचीसुद्धा दिसे?

२) उंदीर, घूस
राहतात बिळात
मुंग्या, साप
दिसे वारुळात

सिंह, वाघ
गुहेत बसे
घोडा कुठे सांगा
बांधलेला दिसे?

३) लिंबाचीच ती एक
जात आहे बरं
नारंगीही तिला
म्हणतात खरं

नागपूरहून येते
तिला नाही तोड
स्वादाने आहे कोण
आंबट गोड?

उत्तर –

१)नकाशा

२) तबेला

३) संत्री

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -