Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनफणसाला श्रीफळ बनवणारी फणसक्वीन

फणसाला श्रीफळ बनवणारी फणसक्वीन

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

जी स्त्री आपल्या जोडीदाराला खंबीर साथ देते तिचा उत्कर्ष होतोच असा एक मतप्रवाह समाजात आहे. या मतप्रवाहाला बळ देणारी स्त्री केरळमध्ये राहते. नवऱ्याचा डबघाईस आलेला व्यवसाय, त्यामुळे होणारी कुटुंबाची आर्थिक ओढाताण, या साऱ्याला तिने तोंड दिलं. व्यवसायाचा नवऱ्याकडून आलेला वारसा जपत त्यांनी फणसालाच श्रीफळ मानत आपली भरभराट केली. ही गोष्ट आहे फणसापासून विविध उत्पादने तयार करणाऱ्या ज्योती लिघितराज यांची.

बारा वर्षांपूर्वी, केरळच्या कलापुरा येथे राहणाऱ्या ज्योती लिघितराज आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्यांच्या पतीचा दहा वर्षे चाललेला व्यवसाय अचानक कमी होत असलेल्या ऑर्डरमुळे कोसळला. त्याचवेळी, त्यांना केरळमधील कायमकुलम येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK) येथे फणसापासून उत्पादने बनवण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयीचा लेख त्यांच्या वाचनात आला. त्यांनी आठवडाभर चालणारे ते प्रशिक्षण पूर्ण केले. ज्योती यांना फणसामध्ये जणू जीवनरेखा सापडली.

आर्थिक आपत्तीतून सावरण्यासाठी फणसानेच जणू त्यांना मदत केली. कायमकुलममधील कृषी विज्ञान केंद्र येथे सुरुवातीच्या प्रशिक्षणानंतर, त्यांनी फणसाचा हलवा आणि फणसाचा मुरांबा असे दोन खाद्यपदार्थ वापरून पाहण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी पथनमथिट्टामधील कृषी विज्ञान केंद्र येथे आणखी एका प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमामुळे त्यांना अनेक प्रयोग करण्यास वाव मिळाला. फळांचा गर, बिया, साली इत्यादींपासून इतर दर्जेदार आणि पैसा कमावून देणारी उत्पादने तयार करायला त्या शिकल्या. फणसापासून त्यांनी फणसाचा हलवा, फणसाचे लोणचे, ड्राय जॅकफ्रुट, फणसपोळी, फणसाची चटणी, फणसाचे पेय, कुकीज असे जवळपास साठच्या वर मूल्यवर्धित उत्पादने त्या तयार करतात.
ज्योती आता १५ लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देतात आणि दरवर्षी केरळच्या विविध भागांतून १० टनपेक्षा जास्त फणसाची खरेदी करतात. कोरोनामुळे या व्यवसायामध्ये महागाई प्रचंड वाढली. कारण फक्त ४ रुपये किलो दराने मिळणारा फणस पाचपट भाववाढ होऊन २० रुपये किलो भावाने मिळू लागला. साहजिकच त्यामुळे फणसापासून तयार होणारी उत्पादने देखील महागली.

केरळमधील अलाप्पुझा येथील कलापुरा आणि कायमकुलम येथील दोन युनिटमध्ये उत्पादनांवर प्रक्रिया करून उत्पादने तयार केली जातात. ज्योती या केरळमध्ये आणि केरळच्या बाहेरील विविध मेळ्यांद्वारे, ग्राहक पेठामधून आपल्या उत्पादनांची विक्री करतात. याशिवाय, त्या पथनमथिट्टा येथील पंडालम, अलाप्पुझा येथील अंबालपुझा आणि कोचीमधील नायथोडे येथे तीन ‘जॅक वर्ल्ड’ नावाने दुकान देखील चालवतात. ज्योती यांच्या कंपनीने तयार केलेली उत्पादने केरळमध्ये लोकप्रिय आहेत.

एका दशकापूर्वी दिवाळखोरीतून बाहेर पडलेल्या ज्योती लिघिथराज आता दरमहा अंदाजे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवत आहेत. फणस हे केरळचे राज्यफळ मानले जाते. फणसावर आधारित उत्पादनांमध्ये तज्ज्ञ असलेल्या त्यांच्या या भरभराटीच्या उपक्रमामुळे त्यांना विविध सामाजिक-उद्योजकीय संस्थांनी गौरविले आहे. ज्योती यांना त्यांचे पती व्ही. पी. लिघितराज यांनी मोलाची साथ दिली. विशेषत: विपणन आणि वितरण या आघाडीवर त्यांची सोबत कंपनीसाठी फलदायी ठरली. नवऱ्याची नोकरी गेली की हात-पाय गाळून जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ज्योती लिघितराजची ही गोष्ट प्रेरणादायी आहे. फणसाला श्रीफळ बनवणारी ज्योती लेडी बॉस म्हटली पाहिजे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -