वृद्धाश्रम ही आजच्या काळाची गरज...

विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. या पुढच्या काळात वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार असेल, तर अशा वेळी ‘वृद्धाश्रम’च वृद्धांसाठी सुखावह ठरतील हे निश्चित आहे. ही गरज का निर्माण होते? याचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, अतिवृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे.


विशेष - लता गुठे


ही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मेसेज आला. तिने लिहिले होते की, “आपले राम गुरुजी काल गेले?” ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. कारण विचारलं असता, तिने सर्व हकिकत सांगितली. आम्हाला घडविणारे राम गुरुजी सहा फूट उंच, गोरेपान, पांढरे शुभ्र कपडे घालणारे, ज्यांनी आमच्या गावातील अनेक पिढ्या घडविल्या. असे आमचे सात्त्विक विचारांचे गुरुजी... तिचं बोलणं ऐकून निशब्द झाले. ती म्हणाली, “गुरुजींनी शेताच्या बांधावर जाऊन, स्वतःला पेटवून घेतले.” हे ऐकून मी अधिकच अस्वस्थ झाले. असं काय घडलं? की ज्यामुळे गुरुजींना आत्महत्या करावी लागली? हे विचारल्यानंतर ती म्हणाली की, “त्यांच्या छोट्या मुलाने त्यांचा अतिशय छळ केला. मोठ्या मुलाने त्यांच्याशी संबंध ठेवले नव्हते. तीन सुशिक्षित मुली त्याही त्यांच्या घरी इतक्या व्यस्त झाल्या होत्या की, त्यांना आपल्या वडिलांकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळाला नाही आणि मोठा मुलगा आणि त्याची बायको कित्येक वर्षांपासून गुरुजींच्या संपर्कातच नव्हते.


किती भयानक आहे हे. मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना घडविण्यासाठी, मुलींची लग्न करण्यासाठी बाप रात्रं-दिवस कष्ट करतो, झिजतो. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या सुखाची स्वप्न पाहतो आणि मुलं बाप वृद्ध झाल्यानंतर अशा पद्धतीने कसे वागू शकतात? त्यांच्या वेळेला वाटलं, त्यांना पेन्शन येत होती. कोणाच्या तरी मदतीने एखाद्या अनाथ आश्रमात का जाऊन राहिले नाहीत ते?


त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या वृद्धाश्रमाला भेटी दिल्या. जेव्हा केव्हा तिथे जाते, तेव्हा वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांसाठी केलेल्या सोयी-सुविधा पाहून बरंही वाटतं; परंतु त्या वृद्धांची जेव्हा सुसंवाद साधते, तेव्हा त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ प्रकर्षाने जाणवते. आयुष्यभर आपण ज्या घरामध्ये राहिलेलो असतो, तिथले आजूबाजूचे लोकं, तो परिसर या गोष्टी ते कधीच विसरत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण आयुष्यभर कष्ट केले आणि त्यांनीच असं आपल्याला वाऱ्यावर सोडलं, याची खंतही त्यांच्या मनात कायम राहते; परंतु माणसाला कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते. काहींनी सांगितलं आता काम होत नाही. एकटं घरात राहण्यापेक्षा इथे आमच्या वयाची चार माणसं भेटतात, गप्पा होतात, घरात बोलायला कोणालाच आमच्याशी वेळ नसतो, म्हणून इथं बरं वाटतं. काहींनी सांगितलं, मूल परदेशी गेले आणि तिकडचेच झाले. काही म्हणाले, आमचे जोडीदार आम्हाला सोडून गेले. एकटं घरात राहताना घर खायला उठतं. म्हणून होती तेवढी जमापुंजी, पेन्शन अनाथ आश्रमाला देतो आणि इथे राहतो. एका आजीने सांगितलं, मला हृदयाचा प्रॉब्लेम आहे. घरात मरून पडले, तरी चार दिवस कोणाला पत्ता लागणार नाही. दोन मुली आहेत, त्या सासरी गेल्या. त्यामुळे माझं कोण पाहणार? म्हणून मुलीनेच सल्ला दिला, वृद्धाश्रमात राहण्याचा आणि मी इथे आले. मी या सर्वांबरोबर खूश राहण्याचा खूप प्रयत्न करते; परंतु माझ्या घराची मला खूप आठवण येते.


खरं तर आता वृद्धाश्रम ही काळाची गरज झाली आहे. बदलत्या काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला हे कळायला पाहिजे की, मुलं आपली म्हातारपणाची काठी असतील की नाही माहीत नाही; परंतु आपल्याकडे असलेला पैसाच आपल्याला वृद्धापकाळात उपयोगी येऊ शकतो. कारण आश्रमात राहण्यासाठीही पैसे लागतात. ही सोय आपण जेव्हा कमवत असतो, तेव्हापासूनच करून ठेवायला पाहिजे.‌ आपण जे कमावत आहोत, त्यातील दहा टक्के तरी आपल्यासाठी वेगळे ठेवायला पाहिजेत. पैसे साठले की, त्याची ‘एफडी’ करून बँकेत ठेवली, तर त्याचे व्याजही येईल आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल, तेव्हा ते आपल्याला उपयोगी येतील. याचा आता सर्वांनी विचार करण्याची वेळ आली आहे; परंतु समाजामध्ये असे अनेक लोक आहेत, जे रोजी-रोटी कमवून आपला उदरनिर्वाह करतात. वृद्धापकाळामध्ये त्यांनी कुठे जावे? अशांसाठी सरकारने कमीत कमी तालुक्याच्या ठिकाणी तरी मोफत वृद्धाश्रमाची सोय करायला हवी.


आम्ही लहान असताना घरातल्या वृद्धांची सेवा करणे, हा संस्कार मानला जात असे. त्यामुळे घरातले सर्वच वृद्धांचा मान ठेवायचे. त्यांचं आजारपण आनंदाने करायचे; परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. समाजासाठी काही करावसं वाटत असेल, तर वृद्धाश्रमाला मदत करावी. होतकरू लोकांनी पुढे येऊन, अनाथ आश्रम उभे करावेत, असे मला वाटते.


काही दिवसांपूर्वी पालघर येथे ‘सरोद फाऊंडेशन’चा कार्यक्रम होता. त्यांनी आनंद वृद्धाश्रमाच्या मनीषा कोटक यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळेला आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका मनीषा कोटक यांच्याशी सुसंवाद साधताना, तिथे राहत असलेल्या वृद्धांची माहिती मिळाली. ती ऐकून मनाला वेदना झाल्या... त्या म्हणाल्या, “आमच्याकडे जे सीनियर सिटिजन आहेत. त्यांना आम्ही आई-बाबा असं संबोधतो, हे माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं. मुले एकदा सोडून जातात आणि परत आई-बाबांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी फार कमी मुलं येतात. इथे असेही वृद्ध आहेत, त्यांची मुलं एका महिन्याचे पैसे भरतात आणि नंतर गायब होतात. जर कोणी सीरियस झालं, तर फोन केला, तर फोन उचलतही नाहीत आणि जर उचलला तर म्हणतात, दवाखान्यात नेऊन ॲडमिट करा. जर काही पैसे लागले तर सांगा. किती भयंकर आहे, हे सगळं. जे आई-वडील मुलांना जन्म देतात, वाढवतात शिक्षण शिकवतात आणि हे सर्व करताना आपल्या इच्छा-आकांक्षा याचाही विचार करत नाहीत. मुलीचे लग्न करताना वेळेप्रसंगी कर्ज काढतात, घर गहाण ठेवतात. मुलीचं लग्न करून सासरी पाठवतात आणि मुली सासरी गेल्या की, आपली जबाबदारी संपली अशाच वागतात. सध्याची पिढी स्वतःपुरचा विचार करणारी अशी आहे. आई-वडिलांचे वय झाले की, त्यांना ती अडगळ वाटायला लागते.”


त्यानंतर लगेचच ‘विश्वभरारी फाऊंडेशन’च्या माध्यमातून पालघर येथे असलेल्या आनंद वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यावेळी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपल्या समाजातील वृद्धांची स्थिती... कमावलेली सारी मिळकत मुलांवर खर्च करतात. कारण त्यांना वाटत असतं, मुलंही आपल्या म्हातारपणाची काठी आहेत, ते करतील. माझ्या सर्व आणि शेवटी अपेक्षाभंगाचं दुःख वाटायला येतं. जवळचा पैसा संपलेला असतो. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत जातं. काम होत नाही, आजार मागे लागलेले असतात, अशा वेळेला कोणापुढे हात पसरवणार? मग मुलं वागवतील तसं खाली मानेने जगायचं. जेव्हा माणसाचा स्वाभिमान दुखावला जातो, त्या वेळेला सर्वात जास्त वेदना त्याच्या मनाला होतात. ही तरुण मुलं नाही समजू शकत, उद्या आपणही वृद्ध होऊ. आपलीही अवस्था अशीच होईल, याचा सारासार विचार करण्याची कुवतच त्यांच्यात नसते.”


मी विलेपार्ले येथे राहायला असल्यामुळे, अनेक घरातली मुलं परदेशात स्थायिक झालेली आहेत. इथे घरामध्ये राहणारे वयोवृद्ध. जोपर्यंत दोघं असतात, तोपर्यंत एकमेकांच्या साथीने कसेबसे आपले शेवटचे दिवस घालवतात; परंतु त्या दोघांमधील एखादा जोडीदार जरी गेला, तरी दुसरा खचून जातो. अशा वेळेला मुलांना त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. अनेक मुलं अशी आहेत की, अंत्यविधी उरकून घ्या, आम्ही लागणारे पैसे पाठवतो, असेही म्हणणारे आहेत.


सध्या समाजातलं वृद्धांचं वास्तव अतिशय भयानक आहे. अशा वेळेला त्यांना आपलं वाटणारं, असं एखादं दुसरं घर असावं. तिथे त्यांना त्यांच्याच वयाचे जोडीदार गप्पा मारायला मिळतील, त्यांची काळजी घेणारे मनीषा कोटक यांच्यासारखे कोणी तरी असेल; परंतु वृद्धाश्रमातही जाऊन राहणे, त्यांना शक्य होत नाही. कारण त्यांच्याकडे तेवढा पुरेसा पैसाही नसतो. महिन्याला पन्नास-साठ हजार रुपये वृद्धाश्रमात देऊन राहणे, हे सर्वच वृद्धांना परवडत नाही. अशा वेळेला शासनाने पुढाकार घेऊन, विचार परिवर्तन करण्यासाठी सेमिनार आयोजित करावेत. वृद्धाश्रमाची व्यवस्था करावी.


मित्र आणि मैत्रिणींनो... आज आपण हा विचार करूया की, आपली म्हातारपणाची काठी आपली मुलं नाहीत, तर आपल्याकडे असणारी जमापुंजी असणार आहे. आपल्या म्हातारपणासाठी आपल्याकडे तेवढे पैसे असायला हवेत की, आपण एक नर्स ठेवू शकतो किंवा आपले हॉस्पिटलचे बिल भरून, आपण घरी येऊ शकतो. पैसे दिले की, सेवा करायला माणसं मिळतात. चांगल्या वृद्धाश्रमात महिन्याला ५० हजार भरले की, अतिशय चांगली व्यवस्था होऊ शकते. आपण आपल्या मुलांना शिकविले, मोठे केले हे आपले कर्तव्य केले. ‘नेकी कर दरिरा में डाल’ या उक्तीप्रमाणे आपणही आपल्या विचारात बदल करायला पाहिजे. आपण आपलं कर्तव्य केलं आहे, यापुढे आपला अधिकार त्यांच्यावर नाही. हा विचार जास्त योग्य आहे.


बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टींमध्ये बदल होतो, तो स्वीकारावाच लागतो. काही बदल झपाट्याने होतात, तर काही बदल अतिशय मंद गतीने त्यामुळे ते चटकन लक्षात येत नाहीत. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आले. त्या मोबाइलने इतकी क्रांती केली आहे की माणसाचे मन, विचार जगण्याचे संदर्भ सारंच बदलत चाललं आहे. हा बदल फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर तो ग्रामीण भागातही झपाट्याने होत चालला आहे आणि प्रत्येक कुटुंबात तो जाणवू लागला आहे. वृद्धांच्या समस्यांचे स्वरूप आणि व्याप्ती बदलते आहे. अशा वेळी ‘वृद्धाश्रम’ वृद्धांसाठी सुखावह ठरतील, अशी निवास व्यवस्थेची नितांत  गरज  आहे, हे निश्चित आहे. ही गरज का निर्माण होते? याचा विचार अगदी तरुण, मध्यमवयीन, वृद्ध, अतिवृद्ध प्रत्येकानेच केला पाहिजे.

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे