Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिककोलाजअद्वैताशी सांगड

अद्वैताशी सांगड

माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे क्षण अनुभवायला हवेत. निसर्गाचा आस्वाद त्यांना घेता यायला हवा.”

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

खरोखर आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती भेटतात की, ज्यांच्याबद्दल जाणून घेऊन, त्यांचे कर्तृत्व पाहून आपण अचंबित होतो. खरं तर या व्यक्तीही आपल्यासारख्याच सर्वसामान्य असतात; परंतु असंख्य कर्तृत्वाचे पैलू त्यांना जोडलेले असूनही, त्यांचे पाय जमिनीवर टेकलेले असतात. अशाच एका धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली.

त्यांचे नाव माधवीताई कुंटे. अनेकांना त्या कथांमधून, कादंबऱ्यांमधून, कवितांतातून भेटल्या असतील. माधवीताईंचं कुटुंब वाचनातला आनंद उपभोगणारं होतं. त्यांच्या घरात त्यांचे आई-वडील, आत्या, बहीण-भाऊ असे सर्व जण वाचत असत. माधवीताईंचे वडील मुलांना त्यांच्या मनाने गोष्टी रचून सांगायचे व या गोष्टी पुढे नेण्यात मुलांना सहभागी करून घ्यायचे. त्यामुळे सर्व मुले यात गुंतून जात. मराठीतील अनेक सोनियाच्या खाणी म्हणजे अनेक दिग्गज लेखकांची पुस्तके त्यांना वाचायला मिळाली.

माधवीताई एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्यावर, त्यांना त्यांच्या वडिलांनी बक्षीस म्हणून हातात पुस्तक ठेवले. त्या मानसशास्त्राच्या विद्यार्थिनी.

बी. ए. ला त्यांनी संपूर्ण मानसशास्त्राचे दहा पेपर दिले होते. त्यांचा विवाह श्रीधर कुंटे यांच्याशी झाला. ते मर्चंट नेव्हीत होते. त्यांचे कुटुंब एकत्र होते, तरी त्यांचा संसार म्हणजे एकखांबी तंबू होता. त्यांचे लेखन तेव्हा एखादी कथा, मुलाखत इतपत मर्यादित होते. त्या शाळा, कॉलेजात शिकवित होत्या.

माधवीताईंच्या आपल्या पतीसोबत दर्याच्या सफरीही होत. त्यांचं अनुभवविश्व अनेक तऱ्हांनी विस्तारत होतं. माधवीताईंना समुद्राची विलक्षण आवड. त्यामुळे एकदा त्या आपल्या पतींसोबत दर्याच्या सफारीला गेल्या. तिथे त्यांना आणखी काही मैत्रिणी मिळाल्या की, ज्या आपल्या पतीसोबत काही महिन्यांसाठी जहाजावर मुक्कामाला आल्या होत्या. अथांग सागराची विविध रूपे त्यांना पाहायला मिळत. एकदा त्यांचं जहाज ‘वे ऑफ विसके’ या मार्गावरून जात होतं. तेव्हा वादळ आलं, समुद्र खवळला. साहजिकच सर्व जण घाबरले. आपापल्या पद्धतीने प्रार्थना करीत होते. जहाज इकडे-तिकडे हेलकावे घेत होते. माधवीताई त्यावेळी आपल्या मुलांना सासुबाईंपाशी सोडून आल्या होत्या. त्यामुळे आपली मुले आता अनाथ होणार की काय, या विचारांनी त्या अस्वस्थ झाल्या. जहाजावरचे कर्मचारी लाईफ जॅकेट्स घालत होते.

आपत्कालीन परिस्थितीत बोट सैल करून ठेवणे, ही कामं सुरू होती. मृत्यू समोर दिसत होता. तेवढ्यातच सर्वांना हिमनग दिसला. माधवीताई म्हणाल्या, ‘‘त्या हिमनगावर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. त्यामुळे निळसर रंगाने तो चकाकत होता. सृष्टीचे हे विलोभनीय रूप मी पाहत होते. आता जहाज या हिमनगावर थडकून मृत्यू येणार, अशी शक्यता वाटत असतानाच, हिमनगाने आपला मार्ग बदलला.” त्यामुळे सर्वांचा मृत्यू टळला. जहाजावरील सर्व लोकांनी परमेश्वराचे आभार मानले.

पुढं मुलं मोठी झाल्यावर, माधवीताईंच्या पतींनी नोकरी सोडून उद्योग करण्याचा विचार केला व माधवीताईही नोकरी सोडण्याचा विचार करीत होत्या. एकदा माधवीताईंची आत्ते बहीण सुप्रिया सरवटे व मेहुणे दिलीप सरवटे त्यांच्याकडे मुक्कामाला असताना कुंटे यांनी त्यांना सागर सफरीतील अनेक चित्तथरारक अनुभव ऐकविले. तेव्हा सुप्रिया यांनी माधवीताईंना हे अनुभव शब्दबद्धं करण्यास सुचविलं. मग माधवीताई व श्रीधर यांनी बसून अनेक प्रसंग नोंदविले. श्रीधर यांनी शिडाच्या जहाजापासून, वाफेवरच्या इंजिनावर चालणाऱ्या जहाजांवर आणि पुढे अत्याधुनिक मोटार व्हेसल्सवरही काम केलं होतं. महिनोनमहिने जहाजावर तरंगत्या विश्वात ४०-५० लोकांचं कुटुंब, त्यांचं जगणं, अधिकारी वर्गाचे ताण, कुटुंबीयांविषयीचं त्यांचं प्रेम, एकूणच व्यापारी जहाजांचे कामकाज अशा गोष्टींचा त्यात समावेश होता. दर्याचं सौंदर्य, रौद्ररूप व दररोज येणारे सागरी अनुभव थरारक होते. या सर्व बाबी चित्रित करणारी कादंबरी लिहावी, असा विचार माधवीताई करू लागल्या. यातून तयार झाली एक कादंबरी ‘मी : एक खलाशी.’ जहाजावरील जीवनाचा सगळ्यांना परिचय व्हावा, त्यातील रोमांचकता, सुख-दु:खे, प्रेमाचे बंध, परस्पर धर्मांविषयी असलेला आदरभाव, गाढ स्नेह, शोकग्रस्तता इ. बाबींचे चित्रण त्यांच्या कादंबरीमध्ये आहे. या कादंबरीने माधवीताईंना नावलौकिक, कौतुक व साहित्य जगातील मोठ्या व्यक्तींचा स्नेह, परिचय मिळवून दिला.

पुढील लेखन प्रवासात माधवीताईंनी जवळपास दोन वर्षे ‘अक्षरभारत’ या साप्ताहिकासाठी महिला व मुलांच्या विभागात संपादनाचे काम केले. परीकथा, साहसकथा, पुराणकथा, मोठ्यांच्या छोट्या गोष्टी, दिनविशेष, कोडी, कविता, चित्रे, म्हणी, शब्दांच्या गमती, सामान्यज्ञान असे लिहिताना छान वाटायचे.

बुद्धीला चालना मिळायची. त्यांचे बालसाहित्य ‘मंगसोमचे लामा’, ‘इंद्रनील मणी’ ही अद्भुतरम्य कादंबरी, ‘किलबिल’ हा बालकवितासंग्रह, ‘संज्या दि ग्रेट’ हा बालकथासंग्रह प्रसिद्ध झाला. मुलांसाठी साहित्यनिर्मिती करताना त्यांचे निरागस, निर्मळ मन अभिव्यक्त होते. त्यानंतर माधवीताईंनी ‘चारचौघी’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘लॉलीपॉप’ या मुलांच्या मासिकाची कार्यकारी संपादिका म्हणूनही काम केले.

एकदा माधवीताई यांनी हिंसाचारासंबंधी अनेक क्षेत्रांतल्या नामवंतांच्या मुलाखती शब्दांकित केल्या होत्या. त्यानिमित्त एक सर्वेक्षण केलं होतं. बाल गुन्हेगारीवर त्यांनी एक दीर्घ लेख लिहिला होता. त्यासाठी खास परवानगी घेऊन, त्यांनी बालसुधारगृहाला भेट दिली होती. तेव्हा त्या बाल न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांशी बोलल्या होत्या. हा मोठा परिसंवाद ‘हेमांगी’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या क्षेत्रात भरपूर काम करण्याची गरज आहे, असे माधवीताई म्हणतात. लहानपणी पालकांनी केलेले संस्कार, आजूबाजूची परिस्थिती, गरिबी, अज्ञान अशा अनेक गोष्टी याकरिता जबाबदार असतात. अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून, त्यांनी ‘हिंसा ते दहशतवाद’ हे पुस्तक लिहिले.

आजमितीस माधवीताईंची १०० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी दूरदर्शनवर ‘सुंदर माझं घर’, ‘ज्ञानदीप’साठी लेखन, सादरीकरण केलं. एकदा माधवीताईंच्या कथांबाबत चर्चा सुरू असताना, स्मिता भागवत त्यांना म्हणाल्या की, “तुझ्या वेगवेगळ्या कथांमध्ये मृत्यू वावरतो आणि तो जीवनाचं एक अविभाज्य वास्तव म्हणून मृत व्यक्तींचे आप्त स्वीकारताना दिसतात. त्या मृत्यूमधून पुन्हा जीवन बहरताना दिसतं. अशा तुझ्या कथा एकत्र कर. आपण त्यांचा एक संग्रह काढू.’’ ती कल्पना श्रीधरजींनाही आवडली. त्यांनी दोघांनी उत्साहाने कथा निवडल्या. त्याची फाईल स्मिता भागवत यांना पाठविली. ‘ग्रंथाली’नं त्यांचं काम पूर्णत्वाला नेलं व तो संग्रह प्रसिद्ध होण्याआधीच श्रीधरना मृत्यूने गाठलं. ते कॅन्सरशी उणीपुरी महिन्यांची झुंज देत, धैर्याने मृत्यूला सामोरे गेले. माधवीताईंना शोकमग्नतेत त्यांच्या स्नेह्यांनी, आप्तमित्रांनी खूप आधार दिला. लेखन-वाचनाने त्यांना काळोखातून खेचून बाहेर काढलं.

अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. ‘मी : एक खलाशी’ या पुस्तकाला ‘दलित साहित्य अकादमी’चा पुरस्कार, ‘ललद्यद’ला अनुवादाचा पुरस्कार, ‘कुलाबा महिला परिषदेने’ समग्र साहित्यासाठी ‘साहित्य सन्मान पुरस्कार’ दिला. माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे क्षण अनुभवायला हवेत. निसर्गाचा आस्वाद त्यांना घेता यायला हवा.” येत्या १९ मे रोजी माधवीताईंचा वाढदिवस आहे. उत्तरोत्तर आपल्याकडून अधिकाधिक कार्य होऊ दे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -