Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Khadse : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही; मात्र...

Eknath Khadse : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही; मात्र…

एकनाथ खडसेंनी केली मोठी घोषणा! भाजपामध्ये प्रवेशाबाबतही स्पष्टच बोलले…

रावेर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये होऊ घातलेल्या पक्षप्रवेशामुळे चर्चेत आलेले नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) त्यांच्या एका घोषणेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, त्यासोबतच ही राजकीय निवृत्ती नसल्याचेही ते म्हणाले आहेत. भाजपामध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाबाबतही त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजूनही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूचित केले होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहेत. या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवत आहे. मी जोडीला मदत करत आहे.

भाजपच्या घरवापसीबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल. म्हणून मी त्याबाबतीत निश्चिंत आहे. मी भाजपमध्ये येणार या मुद्द्यावर काही लोकांची नाराजी होतीच. एवढे वर्ष सोबत काम केले होते. म्हणून सर्व गुणगान करतील असे होत नाही. काही लोक दुखावले जातात, त्यांच्या नाराजीचा परिणाम अशा गोष्टींवर (पक्ष प्रवेश) होत असतो. जे नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मी करत आहे.

विरोध नव्हताच, होते ते नाराजीचे सूर

गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणे आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे वक्तव्य रक्षा खडसेंनी केले. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावेच लागेल. पक्षाच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेऊ. माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या तिघांचा आता विरोध नाही. मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे, असे बेधडक उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले.

रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील, मी भाजपचं काम करेन

शरद पवार गट सोडताना एकनाथ खडसेंनी मला मुलगी म्हणून सोबत येण्याबद्दल विचारणा केली, मात्र मी त्यांना स्पष्ट नकार दिला, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केले. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप मध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहीन असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे, तिला तिथे भविष्य दिसतेय, म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे काम करणार, असे त्यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -