सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा
नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा केला जात आहे. याच आईचे दुसरे रुप म्हणजे सासू. पण सासू-सुनेच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरात समोर आली आहे. यामध्ये सासूने आपल्या मुलाचीही मदत घेत सुनेचा गळा दाबून तिला पाण्याच्या टाकीत फेकले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नोएडामधील गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटी परिसरातील एका कुटुंबामधील सासरच्यांनी त्यांच्या सुनेची घृणास्पद हत्या केल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासू व नवऱ्याने स्वत:च्या बायकोची हत्या केली असल्याचा खुलासा नोएडा पोलिसांकडून करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला होता. या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि सासू आणि पतीने मिळून महिलेची हत्या केली. गौतमबुद्ध नगर युनिव्हर्सिटीतील स्टाफ क्वार्टरमधील पाण्याच्या टाकीत नोएडा पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं असून महिलेची हत्या तिचा पती कपिल आणि सासू सुमित्रा यांनी केल्याचे उघड झाले.
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा
ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुमित्रा यांनी पूनमचे पाय धरले होते, तर पती कपिलने तिचा गळा दाबला होता, असे चौकशीदरम्यान सांगत पूनमची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. पूनम आणि तिची सासू सुमित्रा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. कपिलही या भांडणात सामील झाला होता. नंतर हे भांडण टोकाला पोहोचलं, यावेळी कपिलने पूनमला धक्का दिला, ज्यामुळे ती खाली पडली. यानंतर सासू सुमित्राने पूनमचे पाय धरले आणि पती कपिलने तिचा गळा दाबून तिची हत्या केली.
दरम्यान, पूनमच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह स्टाफ क्वार्टरमधील सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत टाकून आई आणि मुलगा दोघांनी पळ काढला. मॅन्युअल इंटेलिजन्स आणि इलेक्ट्रॉनिक सर्विलंसच्या मदतीने आरोपी कपिल आणि सुमित्रा या दोघांना जिम्स तिराहा येथून नोएडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.