
लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी हजारो चाहते गोळा झाले आणि... नेमकं काय घडलं?
हैदराबाद : दाक्षिणात्यच नव्हे तर अख्ख्या भारतात सुपरस्टार अल्लु अर्जुनचे (Allu Arjun) असंख्य चाहते आहेत. त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा लूक, स्टाईल, अॅक्शन या सगळ्यानेच प्रेक्षक भारावून गेले आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. मात्र, हेच आता अल्लुला महागात पडलं आहे. आंध्र प्रदेशात अल्लुवर आचारसंहितेचं उल्लंघन (Violation of Code of Conduct) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं...
अल्लु अर्जुन ११ मे रोजी आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे त्याचे मित्र आणि YSRCP चे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्या घरी पोहोचला. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना तो रेड्डी यांच्या घरी आल्याचं कळालं, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांनी रेड्डी यांच्या घराबाहेर गर्दी केली. पण यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचे मित्र आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याचं कारण असं की, YSRCP चे आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी उर्फ शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे पुन्हा निवडणूक लढत आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुनने रेड्डी यांच्या घरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावली. अशातच रेड्डी यांच्या घराबाहेर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. अल्लू अर्जुन घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना बघत होता. यावेळी लोक 'पुष्पा-पुष्पा' अशा घोषणा देत होते.
का केला गुन्हा दाखल?
शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या दोघांवर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्लुचे आभार मानण्यासाठी रेड्डी यांचं ट्वीट
"माझा मित्र अल्लू अर्जुन, तू निवडणुकीसाठी मला शुभेच्छा देण्यासाठी नंद्यालपर्यंत प्रवास केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझा पाठिंबा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आमच्या मैत्रीबद्दल मी खूप कृतज्ञ आहे!", असं ट्वीट आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी यांनी केलं.