
उत्तर प्रदेश : एकीकडे कडकडत्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांवर तसेच अनेकांच्या जीवालाही बसत आहे. घोसियान, सूर्यपुरा, गंजभडसरा रोड, रोहतास अशा अनेक ठिकाणी वीज पडून काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच बिहारमध्येही वीज पडून चक्क पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसामुळे बिक्रमगंज उपविभाग परिसरात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण भाजले आहेत. यापैकी एकाला उपचारासाठी उच्च रूग्णालयामध्ये पाठवण्यात आलं असून दोन जणांवर बिक्रमगंज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेजण गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.
याशिवाय, घोसियान कला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता बांधकामात मजूर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. तर सूर्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठगोठणी गावात खेळणाऱ्या आकाश किशोर नामक व्यक्तीचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे. दिनारा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एक अशीच घटना घडली आहे. गंजभडसरा रोड कालव्यावर बेनसागर येथील विनय चौधरी यांचा मृत्यू झाला. रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज, सूर्यपुरा आणि दिनारा पोलीस स्टेशन परिसरात या घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.