बीसीसीआय मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये (Cricket) पहिली बॉलिंग किंवा बॅटिंग कोण करणार हे नाणेफेकीच्या (Toss) आधारे ठरवलं जातं. मात्र, बीसीसीआय (BCCI) देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाणेफेक बंद करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. हा निर्णय पक्का झाल्यास पहिली बॉलिंग किंवा बॅटिंग करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पाहुण्या संघाला असणार आहे. शिवाय आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत (IPL Impact player rule) प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर त्याबद्दल फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधून टॉस पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात पावलं टाकणार असून प्रायोगिक पातळीवर याचा प्रयोग सीके नायुडू ट्रॉफीत केला जाऊ शकतो. जय शाह म्हणाले की सीके नायुडू ट्रॉफीतून टॉस हटवला जाईल. याशिवाय पाहुण्या संघाकडे पहिल्यांदा बॅटिंग करणार की बॉलिंग याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल. सीके नायुडू ट्रॉफी पासून नवी गुणपद्धती देखील लागू करण्यात येणार आहे. काही संघ त्यांना फायदेशीर ठरेल अशी खेळपट्टी बनवून त्याचा फायदा घेत असल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्याचा विचार केला गेला आहे.
क्रिकेटचं वेळापत्रक देखील बदलणार
नाणेफेक बंद करण्याशिवाय बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. यामुळे दोन देशांतर्गत मॅचसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल. गेल्या वर्षी काही संघांच्या कर्णधारांनी दोन मॅचेसमधील कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. जय शाह यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर बीसीसीआयकडून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियम बंद होणार?
बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमधील नियमांमधील बदलांसह आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर देखील मोठा निर्णय घेऊ शकते. इम्पॅक्ट प्लेअर नियम २०२४ च्या आयपीएलमध्ये लागू असून या नियमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जय शाह यांनी हा नियम प्रायोगिक तत्वावर लागू केला होता अशी माहिती दिली. आता या नियमावर विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे बीसीसीआय इम्पॅक्ट प्लेअर नियम देखील रद्द करु शकते.