पावसाची सर, ढोलकीचे सूर, पारंपारिक संगीत अशा भक्तीमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध
डेहराडून : हिंदू धर्मात चार धामची यात्रा करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. त्यामुळे भाविकांना बद्रीनाथ येथील दरवाजे उघडण्याची प्रतिक्षा असते. देशातील चारधामांपैकी गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे १० मे रोजी उघडण्यात आले. त्यानंतर आज पार पडलेल्या पुजेनंतर अत्यंत भक्तीमय वातावरणात बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. हे मंदिराचे दरवाजे पुढील सहा महिने भाविकांसाठी खुले राहणार आहेत.
दरवाजे उघडण्याची प्रक्रिया अशी सुरू झाली
- धार्मिक परंपरेनुसार पूजन करत कुबेर, उद्धव आणि गडू घागरी दक्षिण दरवाजातून मंदिरात आणण्यात आल्या. मंदिराचे मुख्य पुजारी रावल, धर्माधिकारी, हक हक्कधारी आणि बद्री केदार मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधीनुसार दरवाजे उघडले.
- मुख्य पुजारी व्हीसी ईश्वर प्रसाद नंबूदिरी यांनी गर्भगृहात भगवान बद्रीनाथांची विशेष प्रार्थना करत सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी बद्रीनाथमध्ये अखंड ज्योती आणि भगवान बद्री विशाल यांचे दर्शन घेतले.
दरम्यान, बद्रीनाथ मंदिरात प्रवेशासाठी आज पहाटेच हजारो भाविकांनी गर्दी केली होती. प्रवेशद्वार देखील फुलांनी सजवण्यात आले. मंदिराच्या सजावटीसाठी १५ क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. धार्मिक पूजविधी करत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. हलक्या पावसाच्या सरी, लष्करी बँड, ढोलकीचे मधुर सूर, स्थानिक महिलांचे पारंपारिक संगीत आणि भगवान बद्रीनाथाचे स्त्रोत अशा भक्तीमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध झाले होते.