Thursday, July 25, 2024

एक प्रयास …

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

महेश संझगिरी हे ‘आंतरराष्ट्रीय वन्यजीवन प्रकल्पा’चे अध्यक्ष. अँटिबायोटिक्ससह नैसर्गिक आणि कृत्रिम औषधे (रसायनशास्त्र) यात त्यांनी पीएच. डी. केली आहे. त्यांनी अतिशय आत्मीयतेने अनेक विद्यार्थ्यांना घडविले.फार्मा, आयएसओ, पर्यावरण (वन्यजीव), व्यवस्थापन (मार्केटिंग-एचआरडी) या सर्व बाबींमधील सल्लागार सुद्धा आहेत.

वाइल्ड लाइफची अत्यंत आवड असल्यामुळे, ते कायमच वाइल्डलाइफ सफारी आयोजित करत असतात. ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वन्यजीव परिषद आणि रिवाइल्ड युथ गॅदरिंगची संकल्पना जगभरातील कोरोना महामारी दरम्यान ऑक्टोबर २०२० मध्ये रिवायल्ड इन्स्टिट्यूट ऑस्ट्रियाच्या सहकार्याने युरोपियन वाइल्डरनेस सोसायटीद्वारे आयोजित केली गेली. भारतातील तीन विद्यार्थी अथर्व ढासरे, श्रेया पेटावे, दीप दिकोंडवार-पार्ले टिळक विद्यालय, प्राथमिक शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका छाया गाडे आणि इंटरनॅशनल ग्लोबलचे प्रभारी डॉ. महेश संझगिरी यांच्या वाइल्ड लाईफ प्रोजेक्टला या सोसायटीकडून ‘आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स’ अ‍ॅडवोकेट म्हणून दिले गेलेले प्रमाणपत्र आणि अनेक प्रोत्साहन पर प्रमाणपत्रे मिळाली. इंटरनॅशनल वाइल्ड लाईफ प्रोजेक्टकडून ‘स्टार ऑफ रिव्हाइड युथ गॅदरिंग’ ही पदवी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. युरोप आणि अमेरिका या व्यतिरिक्त प्रथमच अ‍ॅडव्होकेट ही पदवी भारतातील या विद्यार्थी, शिक्षक आणि डॉ. संझगिरी यांना प्रकल्प चालू केल्याबद्दल मिळाली.

रिवाइल्ड इन्स्टिट्यूट ऑस्ट्रियाने सातवा रिवाइल्ड युवा मेळावा २६ एप्रिल २०२४ रोजी आयोजित केला. डॉ. बार्बरा, रिवाइल्ड इन्स्टिट्यूट-व्हिएन्ना, ऑस्ट्रिया आणि खालील सर्वांचा यात समावेश होता.

मॉडरेटर म्हणून हेमा नाईक आणि छाया गाडे, पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक शाळेच्या माजी प्राचार्या आणि किलबिल नर्सरीच्या संस्थापक, नेवान नाईक २ री, (खारीसोबत एकोप्याने राहणे), आरव कदम ४ थी (खवले मांजर जीवन प्रवास), दर्शन वळंजू ५ वी (प्रकल्प चित्ता), श्रेया पेटावे ८वी, (वृक्ष लागवड), तेजस्विनी पाटील ९ वी, (वनीकरण), केतन पाटील ८ वी, (बाराशिंगा), कौशिक गावडे ८ वी, (वायू प्रदूषण), अथर्व ढासरे ८ वी, (पाण्याच्या सूज्ञ वापराबाबत जनजागृती), दुर्गेश मारबल्ली ९ वी (ब्लू व्हेल), सिद्धांत खंदारे ९ वी (ग्लोबल वार्मिंग आणि ग्लोबल कूलिंग), डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांनी भारतीय संस्कृती आणि प्रकृती या विषयावर सादरीकरण केले.

हिंदू संस्कार व संस्कृती हे किती सुदृढ आहेत आणि निसर्गाशी कसे संबंधित आहेत याचे सादरीकरण करताना, अनेक उदाहरणे दिली. भारत हा या जगात परिपूर्ण संस्कृती आणि संस्कारांचा देश आहे. आत्मा आणि कर्म यावर हिंदू विश्वास ठेवतो. निसर्गाशी असणारी निकटता कशी, हे थोडक्यात सांगितले गेले.

हिंदू संस्कृती ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलूंवर आधारित आहे. वनस्पती हे निसर्गाचे संतुलन साधणारे माध्यम आहेत. जे वेदांमध्ये तपशीलवार लिहिलेले आहे. त्यातीलच सण हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. भारतातील ऋषी-मुनी हे अत्यंत बुद्धिमत्ता असणारे वैज्ञानिकच असल्यामुळे, त्यांना सामान्य लोकांची मानसिक स्थिती माहीत होती म्हणून त्यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पवित्र ग्रंथ, उत्सव आणि पूजानिर्मिती केली. त्यांचा मूळ उद्देश पाणी, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी या पंचतत्त्वांना बळकट करणे आणि समाजाला सकारात्मक बनवणे होता. महापुराण, गीता, रामायण, वेद यांसारख्या पवित्र ग्रंथांची निर्मिती आणि त्यातून होणाऱ्या उपासना, जप, होम-हवन, पूजा-पाठ, मंत्र-जाप हे मार्ग बनवलेत. होम-हवन हा देवासाठी केला जाणारा अग्नी विधी आहे आणि पर्यावरणासाठी ही वायू शुद्धीकरण प्रक्रिया आहे.

वेद हे हिंदू संस्कृतीचे मूळ ग्रंथ आहेत. वेद म्हणजे ब्रह्मांड आणि जगाचे ज्ञान जे या पवित्र ग्रंथांमधून मिळते. आपल्याकडे ४ वेद आहेत आणि वेदांचा एक भाग ज्याला ‘उपनिषद’ म्हणतात. वृक्षारयुवेदातील देव म्हणजे निसर्ग.वेदानुसार निसर्ग म्हणजे पाच घटकांचे संतुलन राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी असलेली परमेश्वरी अद्भुत शक्ती. आपले पवित्र ग्रंथ म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे ज्ञान, बिया पेरण्यापासून त्याच्या नष्ट होणाऱ्या प्रक्रियेतून उपयोग करण्यापर्यंत ऑक्सिजनपासून औषधापर्यंतचे ज्ञान. निसर्गाची प्रक्रिया काय आहे, ते सर्व काही वेदांमध्ये आहे. समाजात विज्ञान आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ऋषींनी मानवासाठी जे काही नियम बनवले आहेत, ते प्राकृतिक घटकांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आहेत. मानवाने निसर्गाची हानी केली, तर त्यांना ‘याज्ञवल्क्य स्मृती’मध्ये शिक्षा आहे. भारतात अनेक सण जे निसर्गाशी जोडलेले आहेत. प्रत्येक राज्यातील हवामानानुसारच सणांची निर्मिती झाली आहे. ही अनोखी पारंपरिक संस्कृती पर्यावरण, पंचतत्त्व आणि सर्व सजीव सृष्टीला सुदृढ सशक्त करणारी आहे.

पावसाळ्यातील काही सणांचे उदाहरण कृती म्हणजे उपवास. पावसाळ्यात जर आपण जास्त आणि जड अन्न खाल्ले, प्रदूषित पाणी प्यायलो तर आजार होतातच. याचा विचार करून, हे सण साजरे केले जातात. भारतात अनेक आयुर्वेदिक वनस्पती वाढतात. त्यांचा उपयोग अगदी योग्य पद्धतीने सणांमध्ये केला जातो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. जो हिवाळ्यात येतो. या सणांमध्ये भरपूर तळलेले पदार्थ आणि मिष्टान्न खातो. ऋतू बदलाप्रमाणे सजीव सृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या परियोजना आहेत. तुळशीत असलेल्या सर्वगुण संपत्तीमुळे तिचा समावेश पूजेमध्ये प्रामुख्याने केला गेला. सर्व उपासना आणि मंत्र हे निसर्गाच्या नियमानुसार देवासाठी केले, असे संयोजन करून, सर्व सजीवसृष्टीला सुदृढ करण्यासाठी या परियोजना केल्या. मंदिर ऊर्जा स्रोत असल्यामुळे मंदिरात जातो.

मंत्ररचना, उपासना या अत्यंत सामर्थ्यवान आहेत. निसर्गातील प्रत्येक जण सण साजरा करण्यामागील एकच उद्देश आहे, तो म्हणजे निसर्गाशी मानवाची जवळीक. हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्ट ही मानवाकडून निसर्ग संवर्धन आणि संरक्षणासाठी आहे. मानव खूप संवेदनशील असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक सशक्तीकरणासाठी ही निर्मिती केली गेली.

मंत्र, श्लोक, मन आणि शरीर शुद्ध करतात. वेद आणि महापुराणात निसर्गातील प्रत्येक घटकाला खूप महत्त्व आहे. पशु-पक्षी जसे वाघ, गरुड, मासे, मोर आणि उंदीर यांचा देखील या संस्कृतीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात बसून, संतांनी लिहिलेली काही पवित्र ग्रंथ हिंदू धर्मात आहेत. सर्व पवित्र ग्रंथ हे या विश्वातील प्रत्येक सजीवसृष्टीला सुदृढ करण्यास आणि प्रदूषणमुक्त करण्यास मार्ग दाखवितात. हिंदू संस्कृती सर्व जीवसृष्टी आणि पाच घटकांना निरोगी बनवते. म्हणूनच भारतीय संस्कृतीला अधिक महत्त्व दिले जाते.

निसर्ग हा माझा धर्म आणि कर्म आहे हे जेव्हा मानवाला कळेल, तेव्हाच या पाच घटकांचा समतोल आपोआप घडेल. निसर्ग आणि सजीवसृष्टीशी संबंधित अनेक विषयांवर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक यांनी अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केले. ज्याचे कौतुक डॉ. बार्बरा यांनी भरभरून केले. येथे एक गोष्ट निदर्शनास आली की, सध्या ऑस्ट्रियाच्या आजूबाजूच्या देशांमध्ये युद्ध परिस्थिती असल्यामुळे, येथील सर्व शिक्षकांना ट्रेनिंगला जावं लागल्यामुळे, तेथे कोणीही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत नव्हते, तरीही विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे त्यांचे सादरीकरण केले. जरी त्यांनी त्यांचे व्हीडिओ येथे सादरीकरणात लावले असले, तरीही सर्व विद्यार्थी जराही विचलित न होता, अतिशय उत्साही दिसले. अजून एक गोष्ट मनाला चटका लावून गेली की, येणारी पिढी सर्वगुणसंपन्न करण्याचे सोडून, आपण युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून नक्की काय साध्य करू इच्छितो?

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -