रवींद्र तांबे
आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशात महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजऱ्या केल्या जातात. त्यात काही मंडळांचे पदाधिकारी महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या नावाखाली जमा झालेल्या लोक वर्गणीतून चंगळ करताना दिसतात. तेव्हा मंडळाचे सभासद व दानशूर व्यक्तींनी दिलेल्या वर्गणीवर चंगळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.
महापुरुषांच्या जयंतीसाठी वर्गणी देताना पदाधिकाऱ्यांची पारख करून द्यावी. आजही अशी कित्येक मंडळे आहेत ती आपल्या बॅनरखाली कार्यक्रम करतात, मात्र त्याचा जमा-खर्च दाखविला जात नाही. तेव्हा पदाधिकाऱ्यांची चंगळ थांबविण्यासाठी योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे. जर एखाद्या सभासदाने कार्यक्रमाचा हिशोब मागितल्यावर त्याला सांगितले जाते की, तुझी वर्गणी घेऊन जा, या पुढे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मंडळाकडून मिळणार नाही. काही मंडळे खूपच चांगले काम करीत आहेत. त्यांचा पण आपण आदर्श घेतला पाहिजे.
आज आपल्या देशात अशी अनेक मंडळे आहेत ती दरवर्षी महापुरुषांची जयंती आली की लोक वर्गणीतून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रम झाल्यावर वर्गणीदारांना कार्यअहवाल व जमाखर्च दिला जातो. काही ठिकाणी मंडळातील कार्यसम्राट स्वतंत्र कागदोपत्री नामधारी मंडळ स्थापन करून माया मिळवतात. ज्याचे मंडळात वजन आहे अशा व्यक्तीच्या नावे बँक अकाऊंटमध्ये पैसे गोळा केले जातात. अशा वेळी वर्गणीदारांना त्याचा मोबाइल नंबर दिला जातो. मंडळ बाजूला वर्गणी तीसऱ्याच्या नावावर जमा केली जाते. नंतर मंडळाच्या प्रसिद्धीसाठी खर्च न करता स्वत:च्या प्रसिद्धीसाठी खर्च केला जातो. हे कुठे तरी थांबले पाहिजे. महापुरुषांच्या नावावर असे धंदे बंद होणे गरजेचे आहे. तेव्हा सभासदांनी किंवा दानशूर व्यक्तींनी मंडळाचे कार्य पाहून वर्गणी द्यावी.
महत्त्वाची बाब म्हणजे, आपण सर्वजण आपल्या देशातील महापुरुषांची जयंती करून त्यांचे विचार आत्मसात करीत असतो. तसेच त्यांचे प्रेरणादायी विचार नागरिकांना सांगत असतो. यातून जनजागृती होऊन एक चांगला समाज घडू शकतो. त्यासाठी देशातील तरुणांनी एकत्र येऊन अशा भोंदू पदाधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. यातून भ्रष्टाचाराला अधिक खतपाणी घातले जाते. त्यासाठी अशा कार्यक्रमांवर शासकीय अंकुश असायला हवा.
विविध मंडळे स्थापन करून महापुरुषांच्या जयंत्या साजरे करणारे लोक महापुरुषाच्या विचाराप्रमाणे वागतात का? सभासदांच्या सुखदु:खात जातात काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहतील. ज्या महापुरुषांमुळे आपणा सर्वांना प्रेरणा मिळाली, त्यांनी आपल्या हक्कांची जाणीव करून दिली, त्यामुळे त्यांचा जन्म दिन दरवर्षी आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यासाठी एखादे मंडळ स्थापन करून, त्या मंडळाचे पदाधिकारी नियुक्त करून त्यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत असते. मात्र त्याचा जमाखर्च त्वरित दिला जात असे. त्यामुळे त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास टिकून होता. आता मात्र तो विश्वास कमी होताना दिसत आहे. कोणीही मंडळ म्हटले की, आपल्या परीने वर्गणी देत असत. त्याचा जमा-खर्च न चुकता पदाधिकारी द्यायचे. त्यात सत्यही तितकेच असे.
आज परिस्थिती वेगळी आहे. पहिली गोष्ट म्हणजे वर्गणीसाठी पदाधिकाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळते. काही ठिकाणी थोडा फार खर्च जयंती महोत्सवावर करायचा, मात्र त्याची फुगीर आकडेवारी खर्चात दाखवायची. म्हणजे एक प्रकारे महापुरुषांच्या नावावर पैशांची लुटमार करायची असे चित्र सर्रास दिसते. महोत्सव साजरा केला जातो. त्यातील कामे जवळच्या व्यक्तीला दिली जातात. खर्च सांगितला जातो. मात्र बिलांचा थांगपत्ता नसतो. म्हणजे एक प्रकारे गरीब सभासदांकडून जयंतीच्या नावावर पैशांची लयलूट होताना दिसते. तसा हिशोब दिला पाहिजे. तेव्हा पदाधिकाऱ्यांवर योग्य ते नियंत्रण असणे आवश्यक आहे.
महापुरुषांची जयंती जरूर करावी, मात्र पैशांची उधळपट्टी नको. इतकेच काय कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, बँजो पार्टी, मिरवणूक खर्च, स्टेजचा खर्च, फोटोग्राफी, ऑर्केस्ट्रा, रात्रीचे जेवण व गुणगौरव सोहळ्यासाठी आवश्यक भेटवस्तू काही समाजसेवकांनी मोफत दिले तरी त्याचा खर्च जमा-खर्चात दाखविला जातो. मात्र याची बिले विचारली असता तुम्हाला हिशोब समजत नाहीत. आम्ही चांगले काम करीत आहोत? मग सांगा ही रक्कम हिशोबात का? अशा समाजसेवकांचा कार्यक्रमाच्या दिवशी सन्मान होणे गरजेचे असते. उलट आपल्या नातेवाइकांना स्टेजवर बसवतात. त्याचा यथोचित सन्मान केला जातो. तेव्हा अशा पदाधिकाऱ्यांना जमा-खर्च शिकविला पाहिजे. याचा परिणाम देशात भ्रष्टाचार वाढत आहे.
हे भ्रष्टाचारचे एक कारण आहे. त्यासाठी मंडळाची रीतसर नोंदणी करून मंडळाचा जमा-खर्च दरवर्षी हिशेब तपासनीसांकडून तपासणी करून घ्यावा. म्हणजे त्याला कायदेशीर रूप प्राप्त होते. तेव्हा यावर सभासदांचे योग्य नियंत्रण असले पाहिजे. तरच अशा बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसेल. म्हणजे एक प्रकारे पदाधिकाऱ्यांची सभासदांच्या पैशावर चंगळ चाललेली दिसते. तर म्हणे आम्ही राजा, कोणीही आमचे वाकडे करू शकत नाही. जर कोणी आवाज उठविला, तर त्याला सांगितले जाते की तुझी वर्गणी घे आणि जा. इतकेच नव्हे तर कार्यक्रम संपल्यावर दारूच्या पार्ट्या आयोजित करणे, त्यानंतर तीन पत्त्यांचा खेळ यात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तेव्हा महापुरुषांची जयंती साजरी करताना मिळालेल्या वर्गणीचे आर्थिक नियोजन करून जयंती महोत्सव साजरा केल्यास पदाधिकाऱ्यांची चंगळ थांबू शकते. त्यासाठी मंडळांच्या सभासदांची एकजूट असणे गरजेचे आहे.