आईवर गोळ्या झाडून, पत्नीला हातोड्याचा मार तर मुलांना गच्चीवरून फेकले!
सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात आज पहाटे हृदयद्रावक घटना घडली. एका तरुणाने स्वत:च्याच घरातल्यांची घृणास्पद हत्या केल्याची घटना मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापुरात घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने पाच जणांची निर्घृण हत्या करत स्वत:चाही जीव घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मतिमंद व्यक्तीने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. या तरुणाने आईला गोळी मारली, पत्नीला हातोड्याने मारहाण करत तिची हत्या केली आणि त्यानंतर मुलांनाही छतावरुन खाली फेकून त्यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल्हापुरात ही घटना घडली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण मानसिकरीत्या आजारी होता आणि घटनेच्या दिवशी तो खूप दारू प्यायला होता. काल रात्री त्याने आधी आपल्या मुलांना गच्चीवरून फेकून दिले, नंतर आईला गोळ्या घातल्या व पत्नीला हातोड्याने बेदम मारहाण करत तिची हत्या केली.
या हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकरीत्या आजारी होता आणि त्याची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून स्थिर नव्हती. आरोपी अनुराग सिंहने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियांका सिंग (४०), मुलगी अश्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी अरना यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.