इंदौरमधील ‘त्या’ प्रकारावर भाजपा प्रवक्ते अलोक दुबे यांची टीका
इंदौर : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या धामधुमीतच अनेक नेत्यांची पक्षांतरेही होत आहेत. इंदौरमधील (Indore lok sabha 2024) काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम (Akshay Kanti Bam) यांनी देखील शेवटच्या क्षणी काँग्रेसला धक्का दिला. त्यांनी उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे इंदौरमध्ये भाजपाची लढाई सोपी झाली आहे. मात्र, यानंतर आता काँग्रेसकडे उमेदवार न राहिल्यामुळे ते इंदौरमध्ये ‘नोटा’ला (NOTA) मत द्या, असा प्रचार करत आहेत. यावर भाजपा प्रवक्ते आलोक दुबे (Alok Dubey) यांनी जोरदार टीका केली.
इंदौर लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने एकप्रकारे ‘नोटा’साठी प्रचार सुरु केला आहे. ठिकठिकाणी छोटी आंदोलनं, बैठका, कँडल मार्च आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी नोटाला मतदान करावं यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. तर दुसरीकडे, इंदौरमध्ये भाजपसमोर कोणाचे आव्हान नाही. भाजपचे विद्यमान खासदार आणि यावेळीही तिकीट मिळालेले शंकर ललवानी यांच्याविरोधात १३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी इंदौरमध्ये निवडणूक एकतर्फीच होण्याची दाट शक्यता आहे. पण, काँग्रेसने निषेध म्हणून लोकांना नोटाला मत देण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्भूमीवर भाजपचे प्रवक्ते अलोक दुबे म्हणाले की, ”भाजपचा विजय होईल यात कसलीच शंका नाही.पण, काँग्रेस नोटाला समर्थन देऊन नकारात्मक राजकारण करत आहे. लोकशाहीवरील हा हल्ला आहे”, अशी टीका त्यांनी केली आहे.