भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डांचे केजरीवालांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही वयाची अशी तरतूद नाही. मोदीजींचा प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. हे जनतेलाही माहीत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ची संकल्पना साकार होत असून, पुढील ५ वर्षांच्या कार्यकाळात मोदीजी देशाला नव्या उंचीवर नेतील. मोदीजीच आमचे नेते आहेत आणि भविष्यातही आमचे नेतृत्व करत राहतील, असे केजरीवालांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा (JP Nadda) यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पक्षाच्या नियमानुसार पंतप्रधान मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? असा सवाल भारतीय जनता पक्षाला केला आहे. केजरीवालांच्या या प्रश्नाला नड्डा यांनी ‘निवडून येतील तर मोदीच येतील, राहतील तर मोदीच आणि भारताला मजबूत देखील मोदीच बनवतील’, असे उत्तर दिले आहे.
निवडणुकीतील अपयश लक्षात आल्यानंतर केजरीवाल आणि संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी अस्वस्थ आहे. देशाची दिशाभूल करणे आणि गोंधळ घालणे हा त्यांचा उद्देश आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मोदीजींना जनतेचे अतोनात आशीर्वाद मिळत आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधान मोदींप्रमाणे कोणते धोरण नाही की, कोणता ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळेच ते मोदीजींच्या वयाची सबब पुढे करून मार्ग काढत असल्याची टीका नड्डा यांनी केजरीवालांवर केली.