Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीKareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

Kareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानला (Kareena Kapoor Khan) मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. या नोटीसला सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करीना कपूरने तिच्या गरोदरपणाच्या अनुभवावर छापलेल्या एका पुस्तकाचं शीर्षक वादाच्या भोवर्‍यात सापडलं आहे. त्याचसंबंधी ही नोटीस करीनाला बजावण्यात आली आहे.

करीना कपूरने २०२१ मध्ये ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ (Kareena Kapoor Khan Pregnancy Bible) हे तिचे पुस्तक लॉन्च केले होते. या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये ‘बायबल’ हा शब्द वापरल्याने तिने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरविरोधात जबलपूरच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटलं की, करीनाने ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कारण ‘पवित्र ग्रंथ बायबल’ची तुलना करीनाच्या गर्भधारणेशी होऊ शकत नाही. पण पोलिसांनी करीनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.

त्यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन खासगी तक्रार दाखल केली. पण ‘बायबल’ या शब्दाचा वापर करुन करीनानं ख्रिश्चन समाजाच्या भावना कशा दुखावल्या गेल्या? हे सिद्ध करण्यात ख्रिस्तोफर अयशस्वी ठरल्याने दंडाधिकारी न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली. यानंतर त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली असता तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. अशा परिस्थितीत आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी करीना कपूरनं तिच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात ‘बायबल’ हा शब्द वापरून ख्रिश्चन समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. करीना कपूरविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने करीना कपूरला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -