राजरंग – राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर अधूनमधून एखादे सस्पेन्स-थ्रिलर बाजाचे नाटक अवतरते आणि अशा नाटकांची आवड असणाऱ्या रसिकांना सुखद, किंबहुना थरारक अनुभव देते. तीन महिन्यांपूर्वीच रंगभूमीवर आलेले ‘मास्टर माईंड’ हे नाटक या पठडीत फिट्ट बसणारे आहे. हे नाटक अल्पावधीतच वेगाने धावू लागले आहे आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या नाटकाची उत्साही टीम! मराठी नाटकांच्या दिग्दर्शनाचे शतक पार केलेले ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, युवा निर्माते अजय विचारे, अदिती सारंगधर व आस्ताद काळे या कलावंतांची जमलेली जोडी आणि तांत्रिक अंगे, या सगळ्याचे अचूक एकजिनसीकरण झाल्याचा फायदा या नाटकाला झाला आहे. सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, वैचारिक अशा चाकोरीतून बाहेर डोकावण्यास भाग पाडणाऱ्या या नाटकाच्या एकंदरीत प्लॉटमुळे हे ‘मास्टर माईंड’ वेगाने पन्नाशीत येऊन पोहोचले आहे.
नाटकाचे इतके प्रयोग झाले असे असले, तरी नाटकात प्रमुख भूमिका रंगवणाऱ्या अदिती सारंगधर व आस्ताद काळे या दोघांनी त्यांची नाटकावरची पकड अजिबात सुटू दिलेली नाही, हे या नाटकाच्या पन्नाशीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. संपूर्ण नाटकभर केवळ या दोघांचेच रंगमंचावर अस्तित्व असते आणि रसिकांना नाटकात खिळवून ठेवण्याचे कसब त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केल्याचे स्पष्ट दिसते. वास्तविक, अदिती व आस्ताद या दोघांनी यापूर्वी दोन नाटकांत एकत्र भूमिका साकारल्या असल्याने त्यांचे ट्यूनिंग छान जमले आहे आणि त्याचा प्रत्यय या नाटकातही येतो. नाटकातले रहस्य पन्नाशीतही कायम ठेवण्याचे आव्हान या दोघांनी लीलया पेलले असल्याचे या नाटकातून स्पष्ट होत जाते.
‘मास्टर माईंड’ या नाटकाच्या पन्नाशीचे औचित्य साधून बोलताना निर्माते अजय विचारे म्हणतात की, “या नाटकाच्या निर्मितीने मला खूप ऊर्जा मिळाली आहे आणि माझा उत्साहही वाढला आहे. आमच्या या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग १८ मे रोजी दुपारी श्री शिवाजी मंदिरात होत आहे. रसिकांना हे नाटक खूप आवडत आहे. ज्यांना यातला सस्पेन्स जाणून घ्यायची उत्सुकता आहे, त्यांनी या प्रयोगाच्या निमित्ताने यातल्या ‘मास्टर माईंड’ला अवश्य भेट
द्यायला हवी”.
नाटकाचे नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना याद्वारे ‘मास्टर माईंड’चा थरार रंगमंचावर निर्माण झाल्यावर त्यातली उत्सुकता वाढणार, हे तर ओघाने आलेच. त्यानुसार हे नाटक उत्कंठा ताणून धरते आणि पुढे अधिकाधिक रहस्यमय होत जाते. अजय विचारे यांनी त्यांच्या ‘अस्मय थिएटर्स’ या नाट्यसंस्थेतर्फे रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाचे अभय भावे व शरद रावराणे हे सहनिर्माते आहेत. प्रकाश बोर्डवेकर लिखित या नाटकाची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. दिग्दर्शक म्हणून विजय केंकरे यांचे हे १०६वे नाटक आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांचे संगीत अशी टीम या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
‘ती’ परत येते तेव्हा…
नाटकातल्या मंडळींसाठी रसिक हे मायबाप असतात. त्यामुळे त्यांच्या सूचना रंगकर्मींसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. रसिकांच्या सूचनेचा मान ठेवण्याची अशीच एक घटना ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाच्या बाबतीत घडली आहे. भारत आणि अमेरिका या देशांच्या पार्श्वभूमीवर या नाटकातली कथा फुलली आहे. यातली अमेरिकास्थित युवती ‘हनी’ हे पात्र अभिनेत्री अमृता पटवर्धन रंगवत आहे. या पात्राच्या बाबतीत या नाटक मंडळींनी एक बदल केला आहे. परिणामी यात नाटकाच्या शेवटी फक्त व्हीडिओच्या माध्यमातून दिसणारी ‘ती’ रंगमंचावर परत आली आहे.
आता हा नक्की काय ‘प्रयोग’ आहे, याविषयी नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांच्याशी संवाद साधल्यावर, त्या हा बदल स्पष्ट करून सांगतात. “रसिकांच्या सूचनेनुसार आम्ही नाटकात एक सकारात्मक बदल केला आहे. त्या आनुषंगाने नाटकाच्या २५व्या प्रयोगाचे औचित्य साधून, आम्ही रसिकांच्या सूचना अमलात आणल्या आहेत. नाटकाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे व लेखक राजन मोहाडीकर यांच्याशी आम्ही विचारविनिमय केला आणि हा बदल करायचे नक्की केले.
नाटकातली मुलगी ‘हनी’ भारतातून अमेरिकेत गेली आहे आणि ती व्हीडिओच्या माध्यमातून आमच्याशी बोलते, असा मूळ प्रसंग होता. त्याऐवजी आता तिला आम्ही प्रत्यक्ष रंगमंचावर आणले आहे. आता ती भारतातच आहे, असे आम्ही दाखवले आहे. त्यासाठी नेपथ्य बदलून रंगमंचावर आम्ही भारतातले हॉटेल उभे केले आहे आणि आम्ही शिकागोतून बोलतो, तेव्हा ‘हनी’ भारतातल्या हॉटेलमधून प्रत्यक्ष बोलते, असे आता नाटकात दिसते.