Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : अजित पवारांची 'दादागिरी'

Ajit Pawar : अजित पवारांची ‘दादागिरी’

‘छाती फाडली की मरून जाशील’ आणि ‘तु किस झाड की पत्ती’

बीड : छाती फाडली की मरून जाशील स्वत:ला हनुमान समजायला लागला? माझ्या नादी कुणी लागत नाही. तु कसा आमदार होतो हे मी बघतो. माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी चांगला बंदोबस्त केला आहे, अशा गावरान भाषेत विरोधकांचा समाचार घेणा-या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांची पळता भुई थोडी करुन टाकली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उदयनराजे भोसले यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुती आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांना चांगलाच दम दिला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्या पंकजाताईंच्या विरोधात बजरंगा उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. ती कॅपॅसिटी मी वाढवून देत नव्हतो. मात्र धनंजय मुंडेंनी ते वाढवून द्यायला लावली. मी सांगितलं होतं काही गोष्टींची वेसन हातात ठेवावी लागते. कारण मी राजकारणात ३५ वर्ष घासली आहे.

मला माहिती होतं. पण कधी कधी आमच्या धनु भाऊला माणसंच कळत नाही. त्यामुळे गाडी बिघडते. त्यामुळे तुम्ही माझा सल्ला घेत जा. तर हाच बजरंगा म्हणायचा छाती फाडली की, हे दिसेल ते दिसेल. पण छाती फाडली की मरून जाशील कोण दिसेल? हनुमानाने छाती फाडलेली वेगळी. तसेच बार्शी आणि बीडमध्ये त्याचे कारखाने चालू होते. मात्र त्याला काय अवदसा आठवली काय माहिती. पण एकदा पराभूत झालेला असतानाही पुन्हा एकदा उभा राहिला. कारण पैसा आल्यानंतर मस्ती येतेच. त्यामुळे इतके दिवस माझ्याबरोबर राहिला. आता मला सोडलं. त्यामुळे मी सर्व काही देऊन जो मला सोडू शकतो, तो जनतेलाही सोडू शकतो. हा पठ्ठ्या स्वतःही पडणार आणि मुलीलाही ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत निवडून आणता येईना, अशी त्याची अवस्था झाली आहे, असे ते म्हणाले.

त्याआधी “तु कसा आमदार होतो हे मी बघतो” हे वाक्य त्यांनी विजय शिवतारेंना वापरले होते. ते आजही कायम चर्चेत असते. त्याचवेळी काल झालेल्या पारनेर येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी पुन्हा दम भरण्याची भाषा वापरली. महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले “महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है,” अशा शब्दांत अजित पवारांनी लंके यांना दम भरला.

अजित पवार म्हणाले मला इथ आल्यानंतर कानावर आलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. तसंच, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भर सभेतून दमदाटी केली जात आहे. हे असं होत असेल तर “निलेश लंके तु ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे” असा डायलॉगही अजित पवारांनी यावेळी मारला. तसंच, “माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागणाऱांचा मी चांगला बंदोबस्त केला आहे” अशा शब्दांत त्यांनी लंके यांना भर सभेत दम दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -