शिवाजी कराळे
पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणारा भारत आता तंत्रज्ञानाची निर्यात करत वेगळी ओळख निर्माण करत आहे. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा जमाना बदलून वेगवान वंदे, अमृत एक्स्प्रेस सुरू झाल्या असून रेल्वे विभागामध्ये उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यात यश आले आहे. बुलेट ट्रेनचे कामही वेगात सुरू आहे. मोनोरेल, मेट्रोचा विस्तार वाढतो आहे. देशात वेगवान, आरामदायी प्रवास दृष्टिपथात येत आहे.
भारत एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान स्वीकारतो आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात आपली ओळख तयार करत आहे. पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणारा भारत आता तंत्रज्ञानाची निर्यात करायला लागला आहे. पॅसेंजर, मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा जमाना आता बदलला आहे. शताब्दी, राजधानी एक्स्प्रेस सुरू झाल्या. रेल्वेमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यात यश आले. भारतात बुलेट ट्रेनचेही काम सुरू झाले आहे. मोनोरेल, मेट्रोचा विस्तार वाढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडील एका सभेत पुन्हा बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवले. यापूर्वी महाराष्ट्रातून मुंबई-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद आणि मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा झाली होती. त्यापैकी फक्त मुंबई-अहमदाबाद ट्रेनचे काम सुरू झाले आहे.
पंतप्रधान मोदी एकीकडे बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत असताना दुसरीकडे ‘वंदे भारत’ मेट्रोची तयारी सुरू झाली आहे. ही ट्रेन लोकल ट्रेन म्हणून काम करेल. त्याचप्रमाणे वंदे भारत मेट्रोमध्ये जास्तीत जास्त सीट्स असतील. वंदे भारत मेट्रोची ओळख इंटरसिटी किंवा पॅसेंजर ट्रेन म्हणूनही होऊ शकते. वंदे भारत मेट्रो ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित असतील. वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू झाल्यावर दरवाजे आपोआप बंद होतील आणि ट्रेनचा दरवाजा फक्त पुढच्या स्टेशनवर उघडेल. ज्या पद्धतीने रेल्वे वंदे भारत मेट्रोची व्यवस्था करत आहे, त्यावरून भाड्यांबाबत लोकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचे कारण लोक आता अत्याधुनिक, वेगवान आणि आरामदायी सुविधेसाठी थोडे जादा पैसे मोजायला तयार आहेत.
रेल्वे सेवेचा विस्तार करताना जवळच्या शहरांना जोडण्यासाठी ‘वंदे भारत मेट्रो ट्रेन’ ही लवकरच धावणार आहे. दोन मोठ्या शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत मेट्रो’ची चाचणी जुलैमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्वयंचलित दरवाजे आणि बारा डब्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार नवीन वंदे भारत मेट्रोच्या डब्यांची संख्या बारावरून १६ केली जाऊ शकते. या ट्रेनमध्ये अनारक्षित किंवा सामान्य श्रेणीतील प्रवाशांच्या दैनंदिन हालचालींना प्राधान्य दिले जाईल. वंदे भारत मेट्रो देशातील १२४ शहरांना जोडेल आणि शंभर ते अडीचशे किलोमीटरच्या परिघात धावेल.
वंदे भारत मेट्रो वाहतुकीसाठी लखनऊ-कानपूर, आग्रा-मथुरा आणि तिरुपती-चेन्नई असे अनेक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रकल्प राबवण्याचे धोरणही भारतीय रेल्वेने तयार केले आहे. अहवालानुसार, पहिली ट्रेन मेपर्यंत तयार होईल. पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो ताशी १३० किलोमीटर वेगाने प्रवास करेल आणि प्रत्येक डब्यात २८० लोक प्रवास करू शकतील. या ट्रेनच्या डब्यात शंभर लोकांची बसण्याची व्यवस्था असून १८० लोक उभे राहू शकतात. वंदे मेट्रोमध्ये प्रवाशांना लोको पायलटशी बोलण्यासाठी ‘टॉक बॅक सिस्टीम’, सुरक्षेसाठी ‘फेअर-स्मोक डिटेक्शन सिस्टीम’ आणि कवच सिस्टीम यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये असतील. वेगवेगळ्या शहरांमधील लोकांच्या फायद्यासाठी रेल्वे विभाग ही ट्रेन विकसित करत आहे. या ट्रेनमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात कामासाठी जाणाऱ्यांची सोय होणार आहे.
वातानुकूलित डबे असलेल्या वंदे मेट्रोमुळे सर्वसामान्यांनाही आरामात प्रवास करता येईल. विशेषत: या मार्गामुळे दोन राज्यांना जोडण्यासही मदत होणार आहे. वंदे भारत मेट्रो व्यतिरिक्त ५५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापणाऱ्या मार्गांवर ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ आणि १००-५५० किलोमीटरच्या आत ‘चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेस’ गाड्या चालवण्याची तयारी केली जात आहे. नवीन वंदे भारत स्लीपरला राजधानी एक्सप्रेस गाड्यांचा पर्याय म्हणून ओळखले जात आहे. चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’च्या सहकार्याने बंगळूरुमधील ‘भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड’च्या उत्पादन युनिटमध्ये या ट्रेनची निर्मिती केली जात आहे. वंदे भारत मेट्रोमध्ये उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला धक्का लागला तरी प्रवासी पडणार नाही. याचे कारण प्रवाशांना लगेच ‘कॅच स्ट्रिप’ दिली जाईल.
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देशात ‘वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन’ सुरू केली होती आणि तेव्हापासून आता अनेक शहरांमधून वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. जुलै महिन्यात देशाला पहिली वंदे मेट्रो मिळणार आहे. ही वंदे मेट्रो सामान्य दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चालवली जाणार आहे. दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’च्या धर्तीवर ही मेट्रोही धावणार आहे. देशातील ज्या भागात खूप गर्दी असते आणि प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा ठिकाणी ही मेट्रो धावेल. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने वंदे मेट्रो चालवण्याचा विचार केला आहे.
देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन जुलै महिन्यात रुळांवर धावण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला दोन-तीन महिने ती चाचणी तत्त्वावर चालवली जाईल. त्यानंतर चाचणी यशस्वी झाल्यास इतर मार्गांवरही चालवण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या तरी वंदे मेट्रो ट्रेनच्या चाचणीसाठी मार्ग निवडलेला नाही. आतापर्यंत एकूण ५० वंदे मेट्रो ट्रेन तयार आहेत. देशातील पहिली वंदे मेट्रो अतिशय वेगाने धावणार आहे. वंदे मेट्रो ट्रेन पहिल्या टप्प्यात देशातील १२४ शहरांना जोडणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास आणखी ३०० हून अधिक महानगरांना जोडण्यासाठी वंदे मेट्रो ट्रेन सुरू केली जाईल. सहा वर्षांमध्ये देशभरात ३०० हून अधिक वंदे मेट्रो चालवण्याची तयारी सुरू आहे. या महानगरांमधील डब्यांची संख्या गरजेनुसार ठरवली जाईल. ती मेट्रो आणि इंटरसिटी एक्स्प्रेसपेक्षा जास्त वेगाने धावेल
. वंदे मेट्रोला चार, पाच, १२ आणि १६ डबे असतील. जास्त प्रवासी असणाऱ्या मार्गावर १६ डब्यांची मेट्रो असेल. कमी प्रवासी असतील, तिथे चार ते पाच डबे असतील. वंदे मेट्रोमधील आसनांच्या दरम्यान रुंद मार्गांसह प्रत्येक कोचची क्षमता २८० प्रवासी इतकी असेल. त्यात शंभर आसन क्षेत्रांचा समावेश आहे. वंदे मेट्रोला प्रत्येक डब्यात १४ सेन्सर्ससह स्वयंचलित दरवाजे, शौचालये, वातानुकूलन आणि धूर शोधण्याची यंत्रणा असेल. वंदे मेट्रो लखनऊ-कानपूर, आग्रा-मथुरा, तिरुपती-चेन्नई इत्यादी दरम्यान धावण्याची अपेक्षा आहे. याशिवाय बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२६ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेमध्ये पूर्वीच्या तुलनेत बरीच सुधारणा होत आहे. सर्व रेल्वे ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. ट्रेनमध्ये इकॉनॉमी कोच बसवून प्रवाशांची सोय सुधारण्याचे कामही करण्यात आले आहे.
सध्या अनेक रेल्वे स्थानकांचाही कायापालट करण्यात आला आहे. सध्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट मिळणे ही एक समस्या आहे. ती संपवण्यासाठी भारतीय रेल्वेकडूनही काम केले जात आहे. आता ट्रेनचा वेग पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढला आहे. ट्रेनचा कमाल वेग ताशी १३० किलोमीटर इतका निश्चित करण्यात आला आहे. २०३२ पर्यंत वेटिंगची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल. अधिक संख्येने डबे, ट्रॅक आणि लोको बांधल्यानंतर वेटिंगचा प्रश्न नगण्य होईल. त्यानंतर सर्वांना फक्त कन्फर्म तिकिटे मिळतील.
दिल्ली मेट्रोप्रमाणे प्रत्येक डब्यात बसण्याची व्यवस्था केली जाईल. प्रवाशांना बसण्यासाठी कंपार्टमेंटच्या मध्यभागी रुंद बाक बसवण्यात येणार आहेत. चांगली बाब म्हणजे तिकीट आरक्षित करण्याची गरज नाही, कारण ट्रेन फक्त कमी अंतरासाठी असेल. येत्या काळात वंदे मेट्रो मुंबई लोकलची जागा घेऊ शकेल. तिथे लोकल गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. मुंबई लोकलप्रमाणेच दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथेही वंदे मेट्रो धावणार आहे. या ट्रेनचे भाडे किती असेल याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही; पण भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असेल. जास्त पैसे खर्च न करता आरामात प्रवास करता येईल, असे बोलले जात आहे. ही ट्रेन मेट्रोप्रमाणे दिवसातून अनेक वेळा धावणार आहे.
वंदे मेट्रो शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांमध्ये धावणार आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेसची कमी अंतराची आवृत्ती आहे. या गाड्या दिवसातून चार ते पाच वेळा एकाच मार्गावर धावतील. या ट्रेनमुळे प्रवाशांना वेगवान शटलसारखा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे नोकरदार लोक आणि विद्यार्थ्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे सोपे होणार आहे.