२३ हजार कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट, २३ हजार २८४ कंट्रोल युनिट आणि २३ हजार २८४ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.