‘या’ जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता
मुंबई : पुणे, कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
येत्या तीन तासांत इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये मुंबईसह रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/S5G2KHFEzX— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 10, 2024
दरम्यान, पुणे शहरातही ढग दाटून आले असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. खडकवासला आणि सिंहगड रस्ता परिसरात वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.