Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजभाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची

भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

देशद्रोही काँग्रेसला हद्दपार करण्याचे मतदारांना आवाहन

नंदुरबार : निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा देशद्रोही काँग्रेसला निवडणुकीत हद्दपार करा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावीत यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबारमधून सुरु व्हायचा. पण त्यांनी इथल्या आदिवासींना मतांपुरते वापरले. त्यामुळे नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारमध्ये आले आहेत. त्यामुळे ४ जूनला डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शुभ वार्ता पक्की झाली आहे. डॉक्टर हिना गावित गेल्या पाहिजेत दिल्लीत आणि गोवाल पाडवी राहिले पाहिजेत गल्लीत, असे नंदुरबारच्या जनतेने ठरवले असल्याचे ते म्हणाले.

नंदुरबारमधील जनतेने जल, जंगल आणि जमीन सुरक्षित ठेवली आहे. आदिवासी समाजाच्या उत्थान, गौरव आणि सन्मानासाठी पंतप्रधानांनी आयुष्य समर्पित केले आहे. काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीचा कुठलाही प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वनसंपदा कायद्यामध्ये बदल करून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून दिला. काँग्रेसच्या ६० वर्षाच्या काळात जे झालं नाही ते मागील १० वर्षात पूर्ण झाले. पंतप्रधान आवास योजनेतून आदिवासींना हक्काची घरे मिळाली, ग्रामीण भागातील माता-भगिनींना घरात शौचालय मिळाले. देशातील ८० कोटी गरिबांना मोफत रेशन मिळाले. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून आदिवासी समाजाच्या महिला आपल्या भगिनी द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात आली. सरकारने आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली. दोन लाखापेक्षा जास्त वन हक्क दावे मान्य केले. कुपोषण निर्मूलनासाठी व्यापक प्रयत्न केले. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोदी यांनी केले. ज्यांनी आदिवासी समाजाचा उद्धार केला त्या मोदींचे हात बळकट करण्यासाठी डॉ. हीना गावीत यांना मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. पाकिस्तानचा कंबरडा मोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. विरोधकांकडे पाकिस्तानची तळी उचलणारे आहेत. आपल्याकडे गरीब कल्याणाचा झेंडा आहे तिकडे बेईमानीचा झेंडा आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. २०१४ मध्ये विरोधकांनी मोदींवर आरोप केले तेव्हा त्यांचा पराभव झाला. २०१९ ला पुन्हा मोदींवर आरोप केले तेव्हा जनतेने विरोधकांचा सुपडा साफ झाला. आता २०२४ मध्ये जनता विरोधकांना कायमचं घरी बसवणार आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -