नाशिक : सिन्नर : सिन्नर शहरासह तालुका परिसरात अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर वातावरण अचानक ढगाळ झाले. त्यानंतर दुपारी ३ ते ४:३० वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
या पावसाने सिन्नर शहरातील नागरिकांची तसेच शेतकरी राजाची कांदे झाकण्यासाठी धावपळ उडाली. तर दुसरीकडे पूर्वमशागतीसाठी हा पाऊस पंधरा दिवसाने पडला असता तर शेतकरी राजाला फायदेशीर होता. पण काही ठिकाणी पाऊस जास्त तर काही ठिकाणी पाऊस थोड्याफार प्रमाणात पडल्याने शेतकरी राजाची चिंता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
सिन्नर शहरासह तालुक्यात सगळीकडे पाऊस असल्याचे असल्याचे चित्र दिसून आले. परिसरात शुक्रवारी सकाळी अतिउष्ण वातावरण होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले, तर ३ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
या पावसात चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला, तर बघता बघता हलक्या पावसाने मुसळधार पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एकीकडे उष्णता ने अंगाची लाही होत होती, त्यातच पाण्याचा तुटवडा जाणवत होता, अशातच अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी राजा सुखावला असल्याचे दिसून आले.