पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या जंगी सभा होत आहेत. पुण्यामध्ये येत्या १३ तारखेला मतदान होणार आहे. मात्र, अवकाळी पावसाने शुक्रवारी दुपारपासून लावलेल्या हजेरीने महाविकास आघाडीला याचा फटका बसला आहे. पुण्यातील शरद पवार यांची प्रचारसभा पावसामुळे रद्द झाली. शरद पवारांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द झाला आहे.
पुण्यातील वडगाव शेरीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार,आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या सभा होणार होत्या. पण मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीचे सभा रद्द झाली. पुण्यात ज्या ठिकाणी मविआची सभा होणार होती त्या ठिकाणी पाणी साचले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा होणार होती. राज ठाकरेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार होती. मात्र अवकाळी पावसामुळे पुण्यातील महायुतीच्या सभेवरही पावसाचं सावट असणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील विविध भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे काही काळ का होईल नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे.