Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकसाब निर्दोष आणि हिंदू दोषी...?

कसाब निर्दोष आणि हिंदू दोषी…?

ॲड. आशीष शेलार (आमदार आणि अध्यक्ष, मुंबई भाजपा)

आपल्यासोबत कोण आहे आणि कोण नाही, हे एखाद्या संकटातच कळते. तसेच आपला नातेवाईक कोण आणि स्वार्थी कोण? हे लग्नाच्या मानपानात उघडे पडते… राजकीय पक्षांचे छुपे, आतले, दडवलेले, गळ्यापर्यंत आलेले सगळे अजेंडे उघड करण्याचे काम निवडणुकीच्या महोत्सवात होते. लोकसभेच्या या निवडणुकीत काँग्रेससारख्या पक्षाचा, तुकडे तुकडे गँगचा अजेंडा जगासमोर आला आहे. एवढेच नाही तर काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या काही गटांचाही नकाबपोश चेहरा समोर आला आहे. वरकरणी भगवी शाल पांघरून मिरवणाऱ्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांची आतली वेगळ्या रंगाची चादर उघडी तर पडलीच. पण हे एवढे पुढे गेलेत की, यांनी “देव, देश आणि धर्माला” लांच्छन लागावे अशी कृत्ये सुरू केली आहेत. असं काय घडलंय? का घडतंय? आणि कोण आहेत हे नेमके चेहरे?

भारतीय जनता पक्षाने समाजातील विविध क्षेत्रांत उत्तम काम केलेली माणसे संसदेत असावी म्हणून अनेकांना संधी दिली. त्यातील एक भाग म्हणून उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ख्यातनाम विधितज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीच्या एवढ्या मिरच्या काँग्रेसला का लागल्या? काँग्रेसला एवढा का राग यावा? खरंतर कधीही आरोपीचे वकीलपत्र न घेणारे आणि देशाचे, महाराष्ट्राचे, मुंबईचे दुष्मन असलेल्या आतंकवाद्यांना फाशी व्हावी म्हणून लढा देणाऱ्या ॲड. निकम यांना बिनविरोध निवडून द्यावे असे त्यांचे कार्यकर्तृत्व आहे. आम्ही तसे आव्हानही केले पण ते सोडाच काँग्रेसवाल्यांनी त्यांना थेट देशद्रोही ठरवले.

मुंबईवर २६/११ ला जो हल्ला झाला त्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी तसेच मुंबईकरांची क्रूर चेष्टा काँग्रेसने केली. दहशतवादी अजमल कसाबला सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फाशीची शिक्षा झाली. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात कसा होता हेही जगासमोर आले. त्यानंतर जे पाकिस्तान म्हणतेय ती भाषा काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. काँग्रेसने कसाबला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन पाकिस्तानला जे हवे होते तेच केले. कसाब मुंबईत आलाच नाही, कसाबने गोळीबार केलाच नाही, कसाब हा दहशतवादीच नव्हता असे अनेक अर्थ वडेट्टीवार यांच्या बोलण्यातून निघतात.

आज जरी पुस्तकाचे दाखले देत असले तरी त्यांनी बोलताना कसलाही आधार घेतलेला नाही. छातीठोकपणे त्यांनी विधान केले. ज्या पद्धतीने त्यांनी देशाच्या एकूण विश्वासार्हतेबाबत जगासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले त्याबद्दल काँग्रेसला काही वाटले असते, तर काँग्रेसने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली असती. पण तशी कुठल्याही प्रकारची कारवाई काँग्रेसने केलेली नाही. त्यामुळे वडेट्टीवार जे बोलत आहेत ती काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक ती निवडणुकीच्या एका टप्प्यावर जाहीर केली आहे. त्याचा फ्रंटवरचा चेहरा जरी वडेट्टीवार असले तरी खरा चेहरा काँग्रेस हाच आहे.

ज्या पद्धतीने काँग्रेस एका विशिष्ट वर्गाला मतांसाठी धर्माच्या नावावर आरक्षण देऊ पाहतेय त्याच काँग्रेसचा हा दुसरा अजेंडा वडेट्टीवार यांच्या तोंडून काँग्रेसने मांडला आहे. मुंबईची निवडणूक बाकी असताना काँग्रेसने हे वक्तव्य केले आहे. पण काँग्रेसचे हे म्हणणे मुंबईकरांना पटणार नाही. कारण कसाब आणि त्याच्या साथीदार दहशतवाद्यांनी मुंबईवर जो हल्ला केला, कामा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल येथे बेछूट गोळीबार करून मुंबईकरांचे बळी घेतले त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. त्याबद्दल भावनाही तीव्र आहेत. ज्यांचे नातेवाईक गेले त्या कुटुंबांतील अश्रू अजूनही सुकलेले नाहीत. ज्या तुकाराम ओंबळे यांनी आपला जीव धोक्यात घालून देशासाठी बलिदान दिले त्यांचे वीरमरण मुंबई, महाराष्ट्र आणि देश विसरला नाही. या खटल्याची सुनावणी खुली माध्यमांसमोर झाली. त्यामुळे त्यात काय घडले? उज्ज्वल निकम यांनी स्वतःला झोकून देऊन ही कायद्याची लढाई कशी लढली हे जगाने पाहिले आहे.

यात शंका घ्यावी अशी कुठल्याही प्रकारची बाब शिल्लक नसताना आता निवडणुका जिंकण्यासाठी एवढी भयंकर खोटी आणि आतंकवादाला समर्थन देणारी भूमिका काँग्रेसने घ्यावी? संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या भूमिकेचे काँग्रेसला आजही कुठलेही सोयरसुतक नाही. त्यांनी आपल्या देशातील तपास यंत्रणा, न्यायालय आणि ढळढळीत सत्य यालाच खोटे ठरवण्याचा घाट घातला आहे. यात आणखी एक भयंकर म्हणजे आम्ही हिंदुत्ववादी वगैरे वगैरे गळ्याला पाट्या लावून फिरणारा उबाठासारखा एक गट त्यावर काही बोलायला तयार नाही. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना कशी असू शकते? आम्ही थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला होता की, श्रीमान विजय वडेट्टीवार बोलत आहेत ते तुम्हाला मान्य आहे का? त्यावर चकार शब्द काढायला हे तयार नाहीत याचा अर्थ हे त्यांना मान्य आहे.

गेले चार दिवस देशभरात यावर रान पेटले तेव्हा आता त्यांनी जी भूमिका मांडली ती तर काँग्रेसच्याही पुढची भयंकर आहे. ते काँग्रेसला दोष द्यायला, खोटे ठरवायला तयार नाहीत. उलटपक्षी हिंदू दहशतवाद हीच संकल्पना पुन्हा उबाठानेच उखरून काढली? मंत्री हसन मुश्रीफ यांचे भाऊ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन उबाठा गट काँग्रेसच्या भूमिकेला पाठबळ देण्याचे काम करीत आहेतच आणि मुश्रीफ यांची राष्ट्रवादी कुणासोबत आहे हेही ते सांगू पाहत आहेत. पण आम्ही यांच्यासारखे रंग बदलू सरडे नाही. कसाब या देशाचा दहशतवादी होता, त्याने या देशावर, मुंबईवर हल्ला केला, त्याला झालेली फाशीची शिक्षा योग्य होती, ही आमची भूमिका आहे आणि राहणार. कोण कुठल्या पक्षातून कुठे गेला म्हणून ती बदलणार नाही. पाकिस्तानला जे हवेय ते कधीही आम्ही होऊ देणार नाही मग निवडणुका येतील-जातील आमच्यासाठी देश प्रथमच राहणार…!

मालेगाव बाॅम्बस्फोटाचा दाखला देऊन उबाठा गट आता “हिंदू आतंकवाद” ही संकल्पना पुन्हा रुजवू लागले आहेत का? हा आमचा थेट सवाल आहे. त्यावेळी राज्यातील दिल्लीत असलेले एक वजनदार मोठे नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री करू पाहत होते तेच आज उबाठाला म्हणायचेय? साध्वी प्रज्ञा सिंग यांचा शारीरिक, मानसिक छळ करून “हिंदू दहशतवाद” हा शिक्का मारण्याचा डाव त्यावेळी फसला. ते काँग्रेसी अपुरे स्वप्न आता उबाठा पूर्ण करू पाहतेय? काँग्रेसच्या किती सतरंज्या उचलायच्या त्या त्यांनी उचलाव्यात, पण देव, देश आणि धर्माला लांच्छन लागावे अशा भूमिका का घेताय? एका खुर्चीसाठी?

उबाठा गटाने युती तोडली, काँग्रेसचा हात हातात घेतला. त्या दिवसापासून इतिहासचार्य पण बदलले आणि इतिहासही बदलायला सुरुवात केली. भूमिका तर बदलल्याच पण अनेक वेळा युटर्नही घेतले. आम्ही त्यावरून त्यांना टोकलेही होते पण आता या सगळ्याचा कळस व्हावा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हे जाणीपूर्वक केले जातेय. मतांच्या लांगुलचालनासाठी केले जातेय. याकूबच्या कबरीला सजवायचे, अफजल तेरे कातिल जिंदा है… असे म्हणायचे आणि आता कसाबला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र द्यायचे, हे काँग्रेसचे काय चाललेय आणि उबाठाचे त्याला कसे समर्थन आहे, हे न कळायला देशातील जनता काय दूधखुळी आहे काय?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -