Wednesday, April 30, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर करत केजरीवालांना १ जूनपर्यंत जामीन दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने आपच्या कार्यकर्त्यांना प्रचारासाठी बळ मिळण्यास मदत होणार आहे.

अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी ४ जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार ४८ तास अगोदर संपतो, असे सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये २५ मे तर दिल्लीत १ जूनला मतदान पार पडणार आहे.

अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश ट्रायल कोर्टात पाठवला जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्टाकडून सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. तिहार तुरुंग प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अरविंद केजरीवालांना सोडलं जाईल. तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश सुमारे १ तासात निकाली काढले जातात. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला होता. काही तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आक्रमक निदर्शने केली होती. मध्यंतरीच्या काळात केजरीवाल यांनी जामिनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्याने अरविंद केजरीवाल दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगाबाहेर येणार आहेत. हा आम आदमी पक्षासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

Comments
Add Comment