हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यात यलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई : मुंबईसह कोकणात उन्हाचा पारा वाढला असताना, राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा यासह मध्य महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशाच काही जिल्ह्यात हवामान खात्याने (Meteorological Department) अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट दिला आहे.
‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.
‘या’ भागात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात पावसासह गारपीट होण्याची शक्यता
याशिवाय, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उद्या या भागात वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.