Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणचा मेवा हरवलाय...!

कोकणचा मेवा हरवलाय…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं वर्णन साहित्यिकांनी केलेले आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या सृष्टीसौंदर्याने नटलेलं कोकण हे कोणालाही प्रिय होतं. येथील निसर्गसौंदर्य जसं मनमोहक आहे तसंच इथे आंबे, काजू, कोकम, नारळ, जांभूळ, करवंद ही निसर्गाने दान केलेली फळं हे देखील कोकणला निसर्गाने दिलेला हा आशीर्वादच म्हणावा लागेल. एवढं सर्व आपल्या कोकणात पिकते. हापूस आंब्याचा कोकणचा म्हणून एक ब्रॅण्ड तयार झाला आहे. देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा, तर स्वादिष्टपणासाठी प्रसिद्ध झाला आहे. कोकणातील पिकणाऱ्या प्रत्येक फळाचे एकेक वैशिष्ट्य राहिलं आहे. एक तर कोकणातील प्रत्येक फळ हे जसं वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसंच त्याचं आयुर्वेदातही वेगळेपण गुणकारी म्हणून सांगितलं गेलयं. पूर्वीची गर्द झाडी, झुडपांमध्ये असलेलं डोंगरदऱ्यांमध्ये लपलेलं कोकण कुठे आहे हा जरूर प्रश्नच आहे. सिमेंटच्या जंगलांची झालेली वाढ यामुळे कोकणचे हिरवेगार कोकण हे पाठ्यपुस्तकातील एखाद्या कविता किंवा धड्यापुरतंच उरलंय काय? हा प्रश्नही माझ्यासारख्याच्या मनात येऊन जातोय.

कोकणातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले वृक्ष महामार्गाच्या कामामध्ये तोडले गेले. कोकणामध्ये महामार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेली आंबा, वटवृक्षांची तोड झाली. वडाच्या झाडांच्या सावलीत महामार्गाच्या दुतर्फा अनेक पादचारी, प्रवासी विसावत असत. आजच्या घडीला सारंच उजाड झालंय. त्याचे परिणाम यावर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये दिसू लागले आहेत. यावर्षी उष्णतेचा पारा फारच वाढलेला आहे. गेल्या काही वर्षांतील वाढत जाणारी उष्णता आणि वर्षभरात अधून-मधून पडणारा पाऊस यामुळे साहजिकच वातावरणात फार मोठे बदल झाले आहेत. त्याचे परिणाम तर दिसतच आहेत; परंतु त्याचबरोबर कोकणातील आंबा, फणस, काजू जशी बेभरवशाची झाली, तशी कोकणची काळीमैना म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ती जांभळं आणि करवंद पूर्वी ग्रामीण भागात माळरानावर, डोंगरावर असायची.

अलीकडे करवंद तर कुठे दिसतच नाहीत. या करवंदांची जाणीवपूर्वक कोणीही लागवड केलेली नाही. कारण काटेरी झुडपांमध्ये वाढणारी ही करवंदांची झुडपे पूर्वी माळरानावर असायची. साधारण एप्रिल महिन्याच्या मध्याला कच्ची करवंदं करवंदांच्या झुडपांवर असायची. एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या पंधरवड्यात कोकणची काळीमैना बहरायला यायची; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही कोकणातील डोंगरची काळीमैना फारशी कुठे दिसतही नाही. जशी कोकणातील हापूस आंब्याची चर्चा फार होते; परंतु वीस-पंचवीस वर्षांपूर्वी कोकणातील गोरगरिबांच्या कुटुंबीयांचा आधार ठरलेला रायवळ आंबा कालप्रवाहात आज फार कुठे दृष्टीसच पडत नाही. तो कुठे जवळपास दिसेनासाच झालेला आहे.

हापूस आंबा बागायतदारांच्या घरात दिसायचा; परंतु कोकणातील हा रायवळ आंबा असंख्य गोरगरिबांच्या घरात असायचा. कोकणातील ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या आवारात (परसवात) रायवळ आंब्याची दोन-चार तरी झाडे असायची. एप्रिल-मे महिन्यांत या रायवळ आंब्यांना बहर असायचा. प्रत्येकाच्या घराशेजारच्या आवारात कधी-कधी पारिजातकांच्या फुलांचा जसा सडा पडतो, तसाच या रायवळ आंब्यांचा सडा पडलेला असायचा; परंतु रायवळ आंब्याची जाणीवपूर्वक केलेली लागवड आजवर टिकून होती. गेल्या काही वर्षांमध्ये या रायवळ आंब्यांच्या झाडांची संख्या कोकणात कमी झाली आहे. नव्याने मुद्दाम होऊन कोणीही रायवळ आंब्यांची लागवड करीत नाही. रायवळ आंब्यांची आठवण जुन्या पिढीतील लोकांना निश्चितच असेल. रायवळ आंब्यातील गोडवा, त्याचा मिरमिरीतपणा हा वेगळाच असतो.

रायवळ आंबा खाताना त्याचा हाताच्या कोपरापर्यंत गळणारा रसही फार मोठी गंमत आहे. त्याचा आनंदही नेमकेपणाने शब्दातही सांगता येणारा नाही. इतका तो खूप छान सुखावह अनुभव असतो. तीच स्थिती कोकणातील डोंगरची काळीमैना म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या करवंदांच्या झाडा-झुडपांवरून पिकलेली काळी करवंदं काढणे हे खरंतर एक जिकिरीचेच काम असते. काटेरी झुडपातली काळीभोर करवंद काढणं, त्याचा डिंक अंगावर पडू न देता करवंद खाण्याचा आनंद घेणे, हा सगळा खूप छान अनुभव कोकणातच मिळू शकतो. जांभळाचं देखील असंच आहे; परंतु पूर्वपिढीने जांभळाच्या बिया रुजवून असं म्हणता येणार नाही; परंतु सहज म्हणून टाकून रुजून आलेली जांभळाची मोठाली झाडं काही भागांमध्ये आहेत.

आजच्या घडीला जांभळाला फार महत्त्व आलं आहे. मधुमेहींची संख्या वाढल्याने कोकणातून मोठ्या प्रमाणावर जांभुळ पुणे, मुंबईच्या बाजारात जातात. या जांभळाची नव्याने लागवड कोकणात काही भागात झाली आहे. जांभळाच्या लागवडीत व्यावसायिकता आहे. काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडही झाली आहे. कोकणातील या सर्व कोकण मेव्याच्या बाबतीत आता यापुढच्या काळात तो कोकणात किती प्रमाणात टिकून राहील, हे सांगणंच अवघड झाले आहे. एकीकडे वृक्षतोडीमध्ये करवंदांची झुडपं आपण उदध्वस्त करत चाललो आहोत. यामुळे भविष्यात करवंदं उपलब्ध होतील की नाही, हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. कारण करवंदांची लागवड आजवर कोणी केली असेल असे वाटत नाही; परंतु भविष्यात जांभुळ, करवंद, रायवळ आंबा ही नावं टिकवून ठेवायची असतील, तर त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, तर आणि तरच कोकणचा हा मेवा, त्याचा आनंद आपणाला कोकणवासीयांना भविष्यातही घेता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -