Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभक्तांच्या रक्षणाकरिता महाराज धावून येतात

भक्तांच्या रक्षणाकरिता महाराज धावून येतात

गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला

धनश्री पावणस्कर बंगलोर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. ही गोष्ट आहे ऑगस्ट- २०१४ मधली, मी गर्भवती होते तेव्हा पासूनच मी पोथी वाचायला घेतली. रोज एक अध्याय न चुकता अगदी मनापासून वाचीत असे. एक पारायण पूर्ण झाले की नैवेद्य आणि लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढील पारायण सुरू करायची. खूपच छान वाटायचं अध्याय वाचून. आमच्या घरात माझे सासरे साधारण २ महिन्यांनी शेगावला जायचे. त्यामुळे आधी मी त्यांची पोथी वाचत होते. मग त्यांनी अजून एक पोथी आणून दिली. ती पोथी मी सतत माझ्याबरोबर ठेवत होते. एक विश्वास की पोथीबरोबर महाराजही आपल्याबरोबर आहेत.

मी तेव्हा बँकेत नोकरीला होते. मी गर्भवती असल्यामुळे माझी घराजवळ बदली करण्यात आली होती. सगळं छान सुरू होतं. मला जेव्हा आठवा महिना सुरू झाला तेव्हाच नेमकं आमच्या बँकेमध्ये आरबीआय ऑडीट सुरू झालं. त्यामुळे कामाचा ताण वाढला. इतर वेळी रात्री ८.३० पर्यंत सुटणारी बँक रात्री ११ पर्यंत काम खेचू लागली. त्यात मी गर्भवती आहे म्हणून काही सवलत नव्हती.

एके दिवशी जे नको तेच झाले. मला रात्री १० वाजताच्या सुमारास कळा सुरु झाल्या. बँकेच्या स्टाफने सासूबाईंना कळवलं. आणि तातडीने उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. आम्ही सर्व गजानन महाराजांचा धावा करत होतो. डॉक्टरांनी तपासले पिशवीचे तोंड उघडले गेले आहे असे सांगितले आणि त्यावर उपचार म्हणून इंजेक्शन, गोळ्यांचा खुराक सुरू झाला. एक रात्र तिथे ठेवून दुसऱ्या दिवशी महिनाभर पूर्ण आडवं पडून राहण्याची ताकीद मिळाली. मला उठून बसायला अनुमती नव्हती म्हणजे तसे केले की लगेच मला कळा सुरू व्हायच्या. त्यामुळे आम्ही सगळे जरा चिंतेत होतो. पण आडवी पडून का होईना मी महाराजांची मनोमन माफी मागून पोथी वाचन सुरू ठेवलं. आणि माझ्या प्रसुतीच्या एक दिवस आधी मी पारायण पूर्ण केलं आणि माझ्या सासऱ्यांना सांगितलं ते पूजा करतच होते तेवढ्यात मला डुलकी लागली.

खरं तर मला अजिबात अशी तेव्हा झोप यायची नाही कारण त्रास होत असायचा पण तेव्हा मात्र लागली आणि स्वप्नात साक्षात गजानन महाराज. मी आणि ते एका खोलीमध्ये होतो तिथे फक्त एक पट्टा चालायला जागा आणि बाकी पूर्ण होमकुंड होते. नुकताच होम पूर्ण होत होता आणि मी पटकन पुढे गेले महाराजांसमोर उभी राहिले. त्यांच्या पायांवर अगदी डोके ठेवून नमस्कार केला आणि त्यांनी माझ्या कपाळावर होमकुंडातील अंगारा तीन बोटांनी आडवा लावला. हे अगदी मला मी डोकं पायावर ठेवल्याचा स्पर्श, त्यांनी मला अंगारा लावल्याचा स्पर्श मला आजही जाणवतो. हे होताच मला जाग आली आणि मी सासऱ्यांना लगेच सांगितलं. सासऱ्यांची पूजा होताच ते अंगारा आणून लावत होते.

तेवढ्यात अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या सासूबाईंची एक मैत्रीण आदल्यादिवशीच शेगावहून आली होती. ती प्रसाद घेऊन आली होती. दुसऱ्या दिवशी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला गोंडस मुलगी झाली. आणि आम्ही दोघीही सुखरूप होतो. अजूनही मी साखळी पारायण करतेय आणि अजून माझ्याकडून अशीच सेवा महाराजांनी करून घ्यावी अशी मनोकामना करते.

गजानन महाराज की जय.
गण गण गणात बोते!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -