Sunday, July 14, 2024
Homeनिवडणूक २०२४पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी महायुतीच्या समारोपाची सभा होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास व मुंबई महापालिकेने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता. मात्र मनसेला परवानगी दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आता बीकेसीतील मैदानाची चाचपणी सुरु केली.

दरम्यान, १८ मे ला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यात १७ मे रोजी होणाऱ्या महायुतीच्या या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती राहणार असल्याने मोदी व राज ठाकरे मविआवर कोणते टीकास्त्र सोडणार याकडे मुंबईकरांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले असून मतदानाला फक्त १० दिवस शिल्लक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २० मे रोजी मतदान होणार असल्याने १८ मे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

मुंबईत महायुतीचा प्रचाराला वेग आला असून शिवाजी पार्क मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे मनसेने १८ मार्च रोजी रितसर अर्ज केला होता. त्याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेही १८ मेच्या सभेसाठी जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता. पालिकेच्या जी उत्तर विभागाने दोघांचे अर्ज नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मनसेला परवानगी देण्याबाबत ८ मे रोजी नगर विकास विभागाने पालिकेला कळवले. त्यानंतर ९ मे गुरुवारी पालिकेच्या जी उत्तर विभागाने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे.

या सभेसाठी मनसेने प्रथम अर्ज केला असल्याने आम्हाला परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे ३९ दिवस व राज्य सरकारकडे सहा दिवस परवानगीचे अधिकार आहेत. सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन ही परवानगी दिली असल्याची माहिती मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेने यापूर्वीच बीकेसीसाठी एमएमआरडीएकडे अर्ज सादर केला आहे. महाविकास आघाडीची समारोप सभा १७ मे रोजी बीकेसी मैदानात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -