Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखलालूंचे मुस्लीम प्रेम; इंडिया आघाडीला धास्ती

लालूंचे मुस्लीम प्रेम; इंडिया आघाडीला धास्ती

देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा नवा मुद्दा तापला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवे, असा आग्रह धरला आहे. पण धर्माच्या आधारावर लालू आरक्षण देत आहेत, हे पाहून काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीचे नेतेच धास्तावल्याचे दिसत आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांना सगळीकडून ट्रोल केले जात आहे. लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर भाजपा आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत, त्यांचा बेगडीपणा उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले नेतेही घाबरून, लालूप्रसादांचे समर्थन करायला पुढे आले नाहीत, हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर ओबीसींचे आरक्षण काढून, ते मुसलमानांना देण्याचा घाट घातल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे विरोधक बॅक फूट गेल्याचे दिसून येत आहे.

ऐन निवडणुकीच्या प्रचारात मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी लालूप्रसाद यादव यांनी लावून धरली आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची एकतर्फी घोषणा लालू यांनी करून टाकली. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण देता येणार नाही, अशी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असताना लालूप्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाचे समर्थन केल्याने काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना यावर काय बोलावे, हे समजत नाही. त्यांना उघडपणे लालूप्रसादांचे समर्थन करणे अवघड झाले आहे. कर्नाटकात ज्याप्रमाणे एक फतवा काढून, ओबीसी आरक्षणातला टक्का मुसलमानांना परस्पर दिला, तशा प्रकारे इतरत्र आरक्षण मोहीम राबवायचा काँग्रेसचा इरादा होता. लालूप्रसादांच्या मुस्लीम आरक्षणाच्या जाहीर वक्तव्याने त्याला खोडा बसला. त्यामुळे लालूप्रसाद यादव हे आता देशभरात सोशल मीडियावर सगळीकडून ट्रोल झाले आहेत.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची ‘माय’ फॉर्म्युलावर गेले अनेक वर्षे मदार आहे. माय म्हणजे एम आणि वाय. एम म्हणजे मुस्लीम आणि वाय म्हणजे यादव. बिहारमधील मुस्लीम आणि यादव मतांच्या जोरावर लालूप्रसाद यांच्या आरजेडीची भिस्त आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी बरोबरची युती तोडून, भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, लालू पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. ‘माय आणि बाप’ असा नवा नारा दिला. बापमध्ये गरीब, मागासवर्गीय समाजाला आरजेडी पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान याने लोक जनशक्ती पक्षाची धुरा सांभाळताना, दलित मतदारांना कायम स्वत:च्या बाजूने ठेवण्यात यश मिळविले आहे. पक्ष ज्या पद्धतीने लालूप्रसाद यांनी आपल्या हातातील मुस्लीम मतदार इतर कुठे जाऊ नये म्हणून मुस्लीम आरक्षणाचा नारा दिला का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

बिहारमध्ये लालू-राबडी यांच्या कार्यकाळात जंगलराज होते, असा आरोप केला जातो. लालू यांच्या मते विरोधक हे जंगलराजचे नाव घेऊन, जनतेला भडकावत आहेत. भाजपाला संविधान संपवायचे आहे, लोकशाही संपवायची आहे. त्यामुळेच आपण मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे ठामपणे सांगत आहोत, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. “आरक्षणाचा आधार सामाजिक आहे. नरेंद्र मोदींना आरक्षण संपवायचे आहे. आरक्षणासाठी धर्म हा आधार असू शकत नाही. मी नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे,” असे सांगून, जोरदार टीकेनंतर लालू यांनी आपला पवित्रा बदलेला नाही, हे दिसून येते. आम्ही मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देण्याच्या बाजूने आहोत. केंद्रातील सत्ताधारी भाजपाला राज्यघटनेला कात्री लावून आरक्षण संपवायचे आहे, असा आरोप लालू प्रसाद यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लालूजींनी क्षुल्लक मतपेढीचे राजकारण करून एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण हिसकावून घेण्याचे धक्कादायक विधान आहे. आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. तसेच धर्माच्या आधारावर खेळात अल्पसंख्याकांना प्राधान्य देण्याचा काँग्रेस पक्षाचा मानस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. क्रिकेट संघात कोण राहायचे आणि कोण नाही हे सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस ठरवेल, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा लालू यांच्या मदतीला उघडपणे धावून आलेला दिसत नाही. बिहारमधील आरजेडीचा एके काळचा मित्रपक्ष.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड)ने देखील मुस्लीम आरक्षणाच्या टिप्पणीवर लालू यादव यांची निंदा केली. त्यांची भूमिका संविधानाच्या मूलभूत आत्म्याचे तसेच मंडल आयोगाच्या अहवालाचे उल्लंघन करणारी आहे, असे नितीश कुमार म्हणाले. त्यामुळे मुस्लिमाची एकगठा मते पदरात पाडून घेण्याचा विचार करणारी काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी मात्र लालू यांना एकाकी पाडत आहेत. कारण बहुसंख्य हिंदू मतांचा फटका आपल्याला बसू शकतो, याची इंडिया आघाडीला धास्ती वाटत असावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -