मुंबई : एअर इंडिया एक्सप्रेसमधील (Air India Express) क्रू मेंबर्सनी अचानक एकाच दिवशी सामूहिक रजा घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी आजारपणाचे कारण देत सुट्टी घेतल्याने विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. त्याचबरोबर कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या सीक लिव्ह (Sick leave) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस च्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्हचं कारण देत सुट्टी घेतल्यामुळे ७० उड्डाणं रद्द करण्यात आली होती. वरिष्ठ क्रू मेंबर्सच्या अशा वर्तवणुकीमुळे एअर इंडियाने या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एअर इंडिया एक्सप्रेसकडून जवळपास २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कंपनीच्या या धडक कारवाईनं कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. एअरलाइन्सशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली नाही आणि त्यांचे वर्तनही चांगले नव्हते.
दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांनी आज टाऊन हॉल मीटिंग बोलावली असून या माध्यमातून आपल्या समस्या उघडपणे मांडण्यासंबंधीच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा विचार करुन कर्मचाऱ्यांनी नोकरीवर रुजू व्हावं असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे.