Sunday, October 19, 2025
Happy Diwali

आनंदे भरीन तिन्हीं लोक

आनंदे भरीन तिन्हीं लोक

ज्ञानदेव स्वतः ब्रह्मचारी, योगी पुरूष असूनही सांसारिक जीवनातील नात्यांचे नेमके दाखले देतात! ज्ञानदेवांनी ज्ञान देणं आणि भक्तांनी ते घेणं म्हणजेच ' अवघाचि संसार सुखाचा करीन। ‘आनंदे भरीन तिन्हीं लोक’ हा माउलींचा अभंग सार्थ होईल.

ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

तर प्रिया ज्याप्रमाणे आपले पतीशी एकांती ऐक्य पावते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते.’ (ओवी क्र. ८३३)

‘असा जो बुद्धीचा लीनपणा, त्याला ‘शम’ असे म्हणतात. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून, त्यापासून सर्व कर्मांचा आरंभ होतो.’ ओवी क्र. ८३४

‘तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ति। घेऊनि आपल्या हातीं। बुद्धि आत्मया मिळे येकांती। प्रिया जैसी॥’ ओवी क्र. ८३३

ज्ञानदेवांची ही प्रतिभा! त्यापुढे आपल्या बुद्धीने लीन व्हावं. ज्ञानदेव स्वतः ब्रह्मचारी, योगी पुरूष. असं असूनही सांसारिक जीवनातील मधुर नात्याचे किती नेमके दाखले देतात! याचा अनुभव अठराव्या अध्यायातील या ओव्यांतून येतो. अठरावा अध्याय म्हणजे ‘कळसाध्याय’ होय. यात एका अर्थी सर्व ज्ञानाची उजळणी आणि सार सामावलेलं आहे. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, वर्णानुसार गुण कोणते आणि कोणतं कर्म करावं त्याविषयी. यात प्रथम ते ब्राह्मणांच्या ठिकाणी असणारे गुण उलगडून दाखवतात. तेव्हा प्रथम बोलतात ‘शम’ या गुणाविषयी. ‘शम’ म्हणजे चित्ताचं नियंत्रण-नियमन होय. ‘शम’ म्हणजे बुद्धी ‘स्व’रूपाशी एक होणं होय. तेही कसं? तर सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून.

याच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानदेवांनी दिलेलं उदाहरण किती अप्रतिम! संसारातील रथाची दोन चाकं म्हणजे पती आणि पत्नी होय. या दोघांनी एकरूप होणं, ही आदर्श अवस्था होय. यात प्रिया एकांतात आपल्या पतीशी ऐक्य पावते, ती पतीच्या ठायी लीन झालेली असते. प्रेमाची ही सर्वोच्च अवस्था! या अवस्थेचं सुंदर चित्र ज्ञानदेव आपल्या मनात जागवतात. त्यातून मग ‘शम’ या गुणाच्या वर्णनाकडे वळवतात. प्रियेच्या ठायी पतीविषयी जी लीनता असते, तशी बुद्धीची स्वस्वरूपाशी लीनता, एकरूपता म्हणजे ‘शम’ गुण होय. ज्ञानदेवांनी इतकं सहजसुंदर उदाहरण दिल्यानंतर ‘शम’ गुण कोणाला कळणार नाही?

पुढील एक गुण आहे ‘क्षमा.’ याचंही वर्णन किती बहारदार! त्यासाठी कोणता दृष्टांत देतात ते पाहूया. ‘सप्तस्वरांत पंचम स्वर जसा अतिमधुर आहे, तसा ‘क्षमा’ हा गुण होय.’ पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःख सहन करणे म्हणजे हा गुण. इथे पृथ्वी हे तत्त्व ज्ञानोबांनी घेतलं ते किती अफाट! त्यातून ‘क्षमा’ गुणाच्या ठिकाणी असणारी व्यापकता जाणवते. त्यासाठी दिलेला दृष्टांत संगीतातील सुरांचा आहे. सारेच स्वर मधुर आहेत. परंतु त्यातही अतिमधुर आहे पंचम स्वर. पंचम स्वर कानाला मधुर भासतो, तर क्षमाशील वर्तन हृदयाला मधुर वाटतं.

संसार, संगीत अशा आपल्या परिचयाच्या प्रांतातून माऊली आपल्याला दृष्टांताचे असे अनोखे नजराणे बहाल करतात! ज्ञान देतात ते अशा आनंददायी पद्धतीने. त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर...

‘ये मर्हाठियेचिया नगरीं। ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं। घेणें देणें सुखचिवरि । हो देईं या जगा॥’

ज्ञानदेवांनी ज्ञान देणं आणि भक्तांनी ते घेणं हा व्यवहार ‘आनंदे भरीन तिन्हीं लोक’ असा! म्हणून तो सर्व ‘लोकां’त तो सुरू आहे अविरत...

manisharaorane196@ gmail.com

Comments
Add Comment