राज्यातील ‘या’ भागात सूर्याची आग तर काही भागांत पावसाचा यलो अलर्ट
मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक राज्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच सूर्य आणखी आग ओकणार असून तापमान ४४ अंशाच्या पलीकडे जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात नागरिकांना आणखी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा कमी होत नाही. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता तसेच वेगाने वारे वाहत हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
‘या’ भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील १० मे पर्यंत विदर्भ पट्ट्यामध्ये उष्ण वातावरण कायम राहणार असून, सध्याच्या घडीला सोलापूर आणि अकोल्यामध्ये सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, लातूर आणि नांदेडमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर प्राथमिक स्तरावर या भागांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला तामिळनाडूच्या दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, १०मे पर्यंत जळगाव, सोलापूर, अहमदनगर आणि पुण्यातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात काही अंशांची घट होत असली तरीही दुपारच्या वेळी मात्र सूर्याचा दाह वाढत जाणार असून, सायंकाळीही तापमानात घट होणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगितले आहे.