Friday, June 20, 2025

Kolhapur news : कोल्हापूरच्या कटाळे कुटुंबावर काळाचा घाला! तिघांचा नदीत बुडून मृत्यू

Kolhapur news : कोल्हापूरच्या कटाळे कुटुंबावर काळाचा घाला! तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि... नेमकं काय घडलं?


कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरु असतानाच कोल्हापुरात (Kolhapur news) एक दुःखदायक घटना घडली आहे. आज कोल्हापुरात मतदान पार पडत असतानाच नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या आजरा येथील कटाळे कुटुंबातील तिघेजण हिरण्यकेशी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेले असता त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी, कटाळे कुटुंबीय एकत्र कपडे धुण्यासाठी गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्याजवळ आज सकाळी लवकर गेले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर सर्वजण नदीमध्ये आंघोळीसाठी उतरले. बंधाऱ्यामधील पाणी खोल होते त्यामुळे त्यांना पोहताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले. त्यातच तिघांचा बुडून मृत्यू झाला.


अरुण बचाराम कटाळे (वय -५५), उदय बचाराम कटाळे (वय - ५२) या सख्या भावांचा व जयप्रकाश अरुण कटाळे (वय -१३) या तिघांचा मृत्यू झाला. सुदैवाने ऋग्वेद अरुण कटाळे याला वाचवण्यात यश आले. हारूर येथील तरुण अंकुश अशोक चव्हाण याला सर्वजण बुडताना दिसले. त्याने जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या ऋग्वेदला पाण्यातून काढून त्याला वाचवले. मात्र, इतरांना वाचवण्यात यश आले नाही.


दोघांचे मृतदेह मिळाले असून जयप्रकाश अरुण कटाळे याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. यात्रा काळामध्ये ही घटना घडल्याने सुळे गावात एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Comments
Add Comment