पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी
मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा भाजपला सुटली आणि या ठिकाणी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. भाजप किंवा शिवसेना कोणालाही पालघरची जागा मिळाली तरी उमेदवारी गावितांना मिळेल, असा अंदाज होता. मात्र, भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. यानंतर नाराज असलेल्या गावितांनी हेमंत सावरा यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आज पुन्हा एकदा आपला मूळ पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज राजेंद्र गावित यांचा पक्षप्रवेश पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील हजर होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पालघरची जागा भारतीय जनता पक्षाला सुटली. त्यामुळे राजेंद्र गावित यांना उमेदवारीला मुकावे लागले. या सर्व घडामोडींमुळे गावित नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेत आपली नाराजी प्रकट केल्याचे बोलले जात आहे.
कसा होता गावितांचा प्रवास?
राजेंद्र गावित २०१४ साली पालघरमधून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेसोबत भाजपाने युती केल्यानंतर शिवसेनेने पालघरची जागा उमेदवारासहित मागितली. त्यामुळे गावित पुन्हा एकदा शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गावितांचा आज भाजपामध्ये पुनर्प्रवेश पार पडला.