
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
नवी दिल्ली : मसाला (Spices) म्हणजे चमचमीत पदार्थांची चव वाढवणारा घटक. कोणत्याही पदार्थामागची चव ही खरं तर त्यासाठी वापरलेल्या मसाल्यातच दडलेली असते. चांगला मसाला वापरला की पदार्थ छानच होतो. पण हाच मसाला भेसळयुक्त असेल तर? दिल्लीतून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या ईशान्य भागात पोलिसांनी मोठी कारवाई करत १५ टन भेसळयुक्त मसाला (Adulterated spice) जप्त केला आहे. यामध्ये मसाल्याच्या नावाखाली लाकडाचा भुसा आणि अॅसिड वापरले जात असल्याचे समोर आले आहे.
ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. दोन मसाल्यांच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात तब्बल १५ टन बनावट मसाले आढळून आले. पोलिसांनी मसाला प्रोसेसिंग युनिटच्या मालकांसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. दिलीप सिंह (वय ४६), सरफराज (वय ३२), खुर्सिद मलिक (वय ४२) आ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे लोक मसाल्यांमध्ये भेसळ करुन स्थानिक बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करत होते. मूळ मसाल्यांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये हा बनावट माल विकला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बनावट मसाल्यांसह पोलिसांनी झाडांची कुजलेली पाने, खराब बाजरी आणि तांदूळ, लाकडाची पावडर, मिरचीचे खोके, अॅसिड आणि तेल जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावेरिया यांनी याबाबत माहिती दिली. दिल्लीमधील काही उत्पादक आणि दुकानदार हे संगनमत करुन वेगवेगळ्या ब्रँड्सचे बनावट मसाले विक्री करत होते. दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. डीसीपी पावेरिया म्हणाले की, मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आलेली आहे. एक टीम तयार करुन १ मे रोजी छापे टाकण्यात आले.
कारवाईदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं. सिंग आणि सरफराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिंग हा कंपनीचे मालक असल्याची कबुली त्याने दिली. पुढे तपास केला असता काली खाटा रोड, करावल नगर येथे आणखी प्रोसेसिंग युनिट सापडले. तिथेच सरफराज पकडला गेला. पकडलेल्या दोघांनी २०२१ पासून मसाल्यांचा गोरखधंदा सुर केला होता. यापूर्वी हे दोघे कपड्यांची खरेदी-विक्री करत होते. संशयितांची रवानी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.