निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सध्या राजकीय पक्षांचा (Political Parties) जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडत आहे. तर शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत मुंबईत प्रचाराची हवा जोरदार वाहणार आहे. राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते उन्हातान्हात रॅली काढताना दिसतायत. मात्र, आणखी ताकद लावून प्रचार सुरु होण्यापूर्वीच एक मोठी घडामोड मुंबईत घडली आहे, ज्यामुळे निवडणुकीपूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती (Marathi Vs Gujrati) वाद चिघळण्याची शक्यता आहे.
ईशान्य मुंबईतील (Mumbai North East Lok Sabha) एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना प्रवेश नाकारण्यात आला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काल संध्याकाळी ठाकरे गटाचे शिवसैनिक घाटकोपर पश्चिम परिसरात निवडणुकीचा प्रचार करत होते. या भागात असणाऱ्या समर्पण सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.
समर्पण सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव करण्यात आला. तुम्हाला सोसायटीत प्रचार करता येणार नाही, असे सोसायटीच्या लोकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान संपून मुंबईत जेव्हा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरु होईल तेव्हा या मुद्द्यावरुन वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.