Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीChitale Bandhu : चितळेंचे चौथे ‘हायटेक’ शिलेदार इंद्रनील चितळे

Chitale Bandhu : चितळेंचे चौथे ‘हायटेक’ शिलेदार इंद्रनील चितळे

आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कोणाकडे जायचे असेल तर मिठाईची देवाणघेवाण करणे, हा मराठी माणसाच्या परंपरेतील एक भाग राहिला आहे. यासाठी चितळेंची मिठाई, बाकरवडी अशा लोकप्रिय पदार्थांचा हमखास आधार घेतला जातो. चितळेंच्या पदार्थंतील चवीच्या विश्वासार्हतेमुळे गेली ८० वर्षे जुना असलेला हा ब्रँड देशातच नाही, तर परदेशातही नावाजला जात आहेत. ही विश्वासार्हता जपताना आलेल्या चढ-उतारांविषयी चितळेंच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील चितळे यांनी सांगितले दैनिक ‘प्रहार’च्या ‘गजाली’ या कार्यक्रमात. यावेळी दैनिक ‘प्रहार’चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर आणि लेखा व प्रशासन विभागप्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. खाद्य पदार्थांच्या विश्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘चितळे’ या ब्रँडची यशोगाथा थक्क करणारी आहे.

सीमा पवार

चितळे ब्रँडबद्दल सांगायचे तर श्रीखंड, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले हायटेक मिठाईचे दुकान. आज या ब्रँडची चौथी पिढी हा सारा पसारा सांभाळत आहे. कोट्यवधीची भरभराट करणारा, अन्नपदार्थांचा हा व्यवसाय १९१८ मध्ये देशात आलेल्या साथीच्या आजारामुळे सुरू झाला. हे आश्चर्यकारक सत्य चितळे समूहाचे संस्थापक भास्कर गणेश चितळे यांचे पणतू इंद्रनील चितळे यांनी उघड केले. ‘प्रहार’च्या ‘गजाली’मध्ये या लोकप्रिय ब्रँडबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चितळेंच्या चौथ्या पिढीचे शिलेदार इंद्रनील चितळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून त्यांनी गेल्या आठ दशकातील हा थक्क करणारा प्रवास उलगडला.

इंद्रनील चितळे यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेदरलँड्समधील गी फूड सिस्टीम्समध्ये प्रशिक्षण घेतले आणि नंतर कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. ते सांगतात की, “आम्हाला आमच्या वारशाबद्दल स्पष्टपणे सांगितले गेले नाही. पण माझे आजोबा मला त्यांच्यासोबत कारखान्यात किंवा गोठ्यात घेऊन जायचे. आमचे जेवणाचे टेबल अनेकदा कौटुंबिक जेवणाच्या वेळी बोर्डरूमच्या मीटिंगमध्ये बदलत असे.” सुमारे दशकभरापूर्वी इंद्रनील व्यवसायात सामील झाले.

कंपनीतील नवकल्पनांसाठी पुण्यात आणि जगभरातील उत्पादनाच्या वाढीसाठी त्यांनी सुरुवात केली. १९३९ साली आठ दशकापूर्वी दुधाचे पाश्चरायझेशन किंवा त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणीकरण नव्हते. सर्व काही ताजे विकावे लागे. ते इतर दुग्धजन्य पदार्थ जसे की दही किंवा खवामध्ये रुपांतरित करावे लागे. इंद्रनील म्हणतात की, “वीज किंवा कनेक्टिव्हिटी नसल्याने, बाजारावर लक्ष ठेवणे कठीण झाले. तेव्हा भास्कर गणेश चितळे अर्थात बाबासाहेबांनी त्यांचा मोठा मुलगा, रघुनाथ चितळे जो सूरतच्या गिरणीत काम करत होता, याला मुंबईतील व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली.

दूध पुरवठादार होण्यासाठी, तुम्हाला एक मजबूत पुनरावृत्ती ग्राहक आधार आवश्यक आहे, ज्याची मुंबईत त्यावेळी कमतरता होती. त्यामुळे आम्ही आमचा तळ मुंबईहून पुण्याला हलवला. पूर्वी चितळे दररोज सुमारे ४५ ते ५० लिटर उत्पादन विकत होते. त्यांच्याकडे जवळपास २० गाई होत्या. ते जे उत्पादन घेत, त्याचीच विक्री करत. त्यांच्याकडे १०,००० चौरस फुटांचे घर आणि शेजारी गुरांचा गोठा होता. चितळे डेअरी उत्पादन व्यवसाय, जो केवळ अतिरिक्त दुधाच्या साठवणुकीच्या सोयीअभावी सुरू झाला, तो आता दोन व्यवसायांमध्ये विभागला गेला आहे-चितळे डेअरी आणि चितळे बंधू मिठाईवाले.” इंद्रनील सांगतात, “आज आम्ही दररोज सुमारे ८ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करतो, त्यापैकी आम्ही ४ लाख लिटर दुधाची विक्री करतो, तर उरलेले कंडेन्स्ड दूध, दही, कॉटेज चीज, श्रीखंड, तूपामध्ये रुपांतरित केले जाते. आज दुग्ध व्यवसायापासून ७५ किमीपर्यंत संकलन केंद्र आहेत. आमच्यासोबत सुमारे ४०,००० शेतकरी काम करतात.

अंतिम उत्पादनामध्ये कोणतेही स्टिरॉइड्स किंवा कीटकनाशकांचे अवशेष येत नाहीत, याची खात्री करण्यासाठी नियमित चाचण्या देखील केल्या जातात. दुधाची बाजारपेठ मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित आहे. पण आमची मिठाईची बाजारपेठ जगभर आहे. आम्हाला वेगवेगळ्या देशांतील विविध नियमांचे पालन करावे लागते.” इंद्रनील सांगतात, २०२० मध्ये ब्रँडने ८१ वर्षे पूर्ण केली.आज १० राज्ये, २ केंद्रशासित प्रदेश आणि ३० हून अधिक देशांमध्ये वितरक आणि मल्टी-ब्रँड किरकोळ विक्रेत्यांद्वारे कार्यरत आहे. तसेच महाराष्ट्र आणि गोव्यात ८५ हून अधिक स्टोअर्स चालवले जातात. अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया येथे निर्यात होते. आज पेढा ते लाडू बनवणाऱ्या ९०च्या दशकातील पहिल्या पूर्णतः स्वयंचलित मशीन्ससह आरएफआयडी ते अल्ट्रामॉडर्न प्रक्रियेसाठी बिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पूर्ण स्वयंचलित मशीनचा समावेश आहे. या प्रक्रियेत संपूर्ण गटात २,००० हून अधिक लोकांसाठी प्रत्यक्ष रोजगार मिळाले आणि मुख्यतः महाराष्ट्रात असलेल्या आमच्या नेटवर्कद्वारे ४,००० हून अधिक लोकांना अप्रत्यक्षपणे मदत करण्यात सक्षम झाल्याचे इंद्रनील सांगतात. आमच्याकडे पुण्यात ३५ चितळे बंधू फ्रँचायझी आहेत आणि महाराष्ट्र आणि गोव्यात ४० हून अधिक चितळे एक्सप्रेस फ्रँचायझी आहेत.

गुजराथी स्नॅक्स ‘बाकरवडी’ या त्यांच्या स्वतःच्या प्रकारासाठीही देशी ब्रँड लोकप्रिय आहे. चितळेंची बाकरवडी कशी तयार झाली, याविषयी ते सांगतात, “१९७० मध्ये गुजरातमधील एका व्यक्तीने भाऊ साहेबांची बाकरवाडीशी ओळख करून दिली. पण गुजराती रेसिपी अधिक गोड होती. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रीय चवीनुसार रेसिपीमध्ये वेगळा मसाला टाकण्याचा विचार केला. राजाभाऊ चितळेंना नागपूरमधल्या एका शेजाऱ्याने पुढची वडी कशी बनवायची हे शिकवले. हीच वडी आणि गुजराती बाकरवडी एकत्र करून तयार झाली चितळेची बाकरवडी. आज इंद्रनील या शिलेदाराने आपल्या परंपरागत व्यवसायाला हायटेक रूप देऊन या व्यवसायातील खुसखुशीतपणा जपला आहे.

…अन् साताऱ्याचे चितळे पोहोचले सांगलीला!

वैष्णवी भोगले

चितळे बंधू मिठाईवाले एक प्रतिष्ठित भारतीय स्नॅक्स एंटरप्राइझने भारताच्या पाककला क्षेत्रात आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्रात उगम पावलेला हा ब्रँड दर्जेदार नमकीन आणि मिठाईचा समानार्थी शब्द बनला आहे. त्यांच्या समृद्ध इतिहासासह, चितळे बंधू केवळ काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत, तर त्यांनी चितळे कुटुंबाची लवचिकता आणि नावीन्यपूर्णता दर्शवून जागतिक स्तरावर आपली पोहोच वाढवली आहे.

भास्कर चितळे यांनी ऐंशी वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक व्यवसायातून कुटुंब पोसण्यापुरतेही उत्पन्न मिळत नाही, महागाई सतत वाढते आहे, म्हणून उत्पन्न वाढविण्यासाठी चार दुभती जनावरे घेऊन दुग्ध उत्पादनाचा जोड व्यवसाय सुरू केला. परंतु नंतर तोच त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला. ते सातारा येथील लिंबगाव येथे छोट्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्याकाळी खेड्या-पाड्यातून कुठल्याही प्रकारच्या पशुवैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध नव्हत्या. १९१८ मध्ये त्यांची गुरे एका अज्ञात आजाराला बळी पडली. यामुळे चितळे कुटुंबाच्या या व्यवसायात मोठे नुकसान झाले. तेव्हा भास्कर चितळे यांनी कुटुंबासह मुंबईला येण्याचे ठरवले. ट्रेनमध्ये भेटलेल्या एका अनोळखी गृहस्थाने चितळेंची समस्या समजून घेतली आणि त्यांना सांगली येथील भिलवडी येथे जाण्यास सांगितले. कृष्णा नदीच्या काठी हे गाव वसलेले आहे. भास्कर चितळे यांनी भिलवडी गावी आपला नवा व्यवसाय पुन्हा उभारला. मुंबई हे ब्रिटिश सैन्याच्या हालचालींचे केंद्र असल्यामुळे सैन्याला दुधाची कमतरता भासेल, हे त्यांनी ओळखलं होतं. चितळे बंधूंना पहिलं मार्केट मिळालं, ते मुंबईमध्ये. मुंबईमध्ये वेगवेगळ्या डेअरीमध्ये चक्का, खवा, दूध जास्त प्रमाणात विकले जायचे.

भिलवडीत कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना, मुंबई मार्केटमध्ये प्रॉडक्ट्सचे काय होतंय, याचा थांगपत्ता नसायचा. अनेकदा खराब झालेल्या वस्तूंची तक्रार उशिरा पोहोचत होती. त्यात दलालांनी केलेली फसवणूक अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे भास्कर चितळे यांनी सूरतला असणाऱ्या आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे रघुनाथराव चितळे (भाऊसाहेब) यांना बोलावून घेतले. भाऊसाहेबांना गुजरात आणि मुंबई मार्केटमध्ये होणाऱ्या हालचालींचा अनुभव होता. त्यामुळे त्यांना मुंबईला पाठविले. मुंबईमध्ये ५-६ वर्षं हा व्यवसाय सुरळीत चालू लागला. पुण्यात बदली होऊन आलेले किंवा सेवानिवृत्त झालेली बरीचशी मंडळी राहत असल्याने, चितळेंनी आपला जम पुण्यात बसवून आपला बी टू बी अर्थात बिजिनेस टू बिजिनेस ज्यात उत्पादनानंतर घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विकणे, असा व्यवसाय सुरू केला.

१९४७ साली त्यांनी बी टू सी अर्थात बिजिनेस टू कस्टमर ज्यात उत्पादन थेट वापरकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची पद्धत आणायचा विचार केला. बी टू सीमध्ये एका दिवसात दुधाचे प्रोसेसिंग करणे शक्य नव्हते. दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे दुधाचे पेढे, बर्फी पदार्थ बनवण्यात आले. व्यवसायाची वाढती मागणी बघून ‘चितळे बंधू’ आणि ‘चितळे डेअरी’ असे व्यवसाय उभे राहिले. १९७० सालात राजाभाऊ चितळे मराठा चेंबरच्या वतीने जपानला गेले असता, तिथे त्यांच्या लक्षात आले की, जपानमध्ये दूध पॅकिंग करून विकलं जात. ही पद्धत लक्षात घेत त्यांनी फ्रान्सवरून पॅकेजिंगच्या मशीन्स विकत घेतल्या. त्यामुळे पॅकिंग केलेलं दूध ग्राहकांपर्यंत पोहोचू लागलं आणि अशाप्रकारे सातारा ते सांगलीच्या या रसाळ प्रवासाने एका मोठ्या उद्योगसमूहाचा पाया रचला.

आपुलकी जपणारे चितळे…

सखी गुंडये

चितळे’ हे नाव आज प्रत्येक मराठी घरात पोहोचले आहे. सणावाराला हमखास घरी चितळेंचे पदार्थ आणले जातात. पण मोठ्या प्रमाणावर जाहिराती न करताही, हा ब्रँaड इतका लोकप्रिय कसा? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. ‘प्रहार’च्या ‘गजाली’ कार्यक्रमात संवाद साधताना, इंद्रनील चितळे यांनी हा ब्रँड लोकांच्या मनात आपुलकी निर्माण करण्यात कसा यशस्वी झाला, कसं मार्केटिंग करण्यात आलं याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

इंद्रनील चितळे म्हणाले, आमची कंपनी ही खासगी मालकीची असल्यामुळे मार्केटिंग आणि जाहिरातीच्या बाबतीत आम्ही थोडे हात राखून आहोत. वितरण हा गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये वाढलेला व्यवसाय आहे. त्यामुळे आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना किती जास्त पदार्थ विकता येतील, हे आमचं मार्केटिंग होतं. मात्र थर्ड पार्टीकडे पदार्थ द्यायची वेळ येते, तेव्हा मार्केटिंगची गरज पडते, कारण तेव्हा ब्रँड रिकॉल महत्त्वाचे असते. शिवाय मार्केटिंगप्रमाणे पदार्थच उपलब्ध नसतील, तर मार्केटिंगचे पैसे वाया जातात. गेल्या सहा वर्षांत आम्ही काही कोटी रुपये केवळ क्षमता विस्तारासाठी वापरले आहेत. येत्या जुलैपासून त्याचा विस्तार होईल. येत्या दिवाळीतील आमची कॅम्पेन्स तुम्हाला मोठ्या ब्रँड्ससारखी दिसतील, असे त्यांनी सांगितले

मुंबईमध्ये चितळ्यांची दुकानं आणि पदार्थ कमी उपलब्ध आहेत. यावर इंद्रनील म्हणाले की, एकट्या मुंबईची मागणी ही जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्राएवढी आहे. त्यामुळे मुंबईचा विचार करताना जर उपलब्धताच नसेल, तर तेवढा पुरवठा करता येणार नाही. आमचा कौटुंबिक व्यवसाय दुकानदारीवर आधारलेला असल्याने, आम्ही मर्यादेत उत्पादन करतो. यावर्षी १०० तर पुढच्या वर्षी १५० अशा पद्धतीने वाढ करण्याची आमची योजना असते. आम्ही थेट ३०० वर उडी घेत नाही. असलेले पदार्थ विकले गेले की, आम्ही समाधानी असतो. पण यात आता आम्ही चौथी पिढी असल्याने क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे लवकरच पदार्थांची उपलब्धताही वाढेल.

चितळे जास्त मार्केटिंग करत नसले, तरीही चितळ्यांच्या जाहिराती हा चर्चेचा विषय आहे. छोट्या-छोट्या जाहिराती नव्हे, तर चितळे ३ ते ४ मिनिटांपर्यंतच्या शॉर्ट अॅड फिल्म्स बनवतात. याचीही इंद्रनील यांनी पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, “आम्हाला अनेक जणांनी सांगितलं की, तुम्ही ७० वर्षे जाहिरातच केलेली नाही. तुमची जाहिरात म्हणजे, पाडव्याच्या दिवशी मलईचा चक्का आणि राखीपौर्णिमेच्या दिवशी नारळ बर्फी. त्यामुळे तुम्ही अचानक जाहिरात करायला लागलात, तर असं वाटेल की खप होत नाही म्हणून जाहिरात करत आहात. मधल्या काळात अफवा पसरली की, चितळ्यांनी व्यवसाय विकला. इतक्या वर्षांत चितळ्यांनी लोकांशी संबंध जपण्याकरिता जास्त वेळ देणे गरजेचे होते. जो गेल्या ५-६ वर्षांत दिला गेला.

आम्ही एकाच प्रोडक्टची जाहिरात न करता, संपूर्ण ब्रँडची जाहिरात करू लागलो. कारण एकदा लोकांच्या मनात चितळे ब्रँडबद्दल आपुलकी निर्माण झाली की, प्रोडक्ट कोणतंही विकलं गेलं, तरी फायदा आमचाच होणार आहे. म्हणून आम्ही ब्रँड फिल्म्स करायला लागलो. गेल्या तीन वर्षांत त्यामुळे लोकांच्या डोक्यात चितळे हा ब्रँड आहे, हे पक्कं बसलं आहे.

त्यानंतर आता आम्ही हळूहळू प्रोडक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहोत. मार्केटिंगच्या या पाच वर्षांच्या मोठ्या प्रोसेसमधील हे शेवटचं वर्ष असल्याने, यंदा तुम्हाला चितळेंच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दिसतील,” असे इंद्रनील यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत फार जाहिराती न करताही, चितळे आपुलकी जपण्यात नक्कीच यशस्वी झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -