
आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करणार
मुंबई : देशभरात एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी तर दुसरीकडे महागाईची झळ सुरु आहे. अशातच ग्राहकांना एक आनंदाची बातमी मिळत आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून याचा ग्राहकांचा चांगलाच फायदा होणार आहे. आरोग्य विमा अधिक परवडणारा आणि आकर्षक बनवण्याच्या उद्दिष्ट्याने केंद्र सरकार आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुम्हाला या गोष्टीचा अधिक फायदा होणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ३०,००० रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या १८ टक्के जीएसटी दरावरून १२ टक्के करणार असून आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते असे सांगितले आहे.
अर्थविषयक संसदीय स्थायी समितीने फेब्रुवारी महिन्यात विम्यावरील १८ टक्के जीएसटीचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. आरोग्य विमा परवडणारा बनवण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी किरकोळ विमा पॉलिसी आणि मुदतीच्या पॉलिसींवरील जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे समितीने म्हटले होते.
दरम्यान, देशात जीएसटी लागू होत असताना, कोणत्याही व्यक्तीने आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास त्याला १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता. जीएसटीच्या आधीच्या काळातील १५ टक्के सेवा कराच्या तुलनेत हा दर तीन टक्के अधिक होता. आयकराच्या कलम 80D च्या नियमांनुसार, आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे. या प्रलंबित प्रस्तावावर लोकसभा निवडणूक २०२४ पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.