Friday, December 13, 2024
Homeक्राईमDombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशातच नवरा-बायकोचं भांडण सोडवणं दोन व्यक्तींना महागात पडल्याच्या दोन धक्कादायक घटना डोंबिवलीतून (Dombivli Crime) समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करायला गेलेल्या दोन व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. या घटनांमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

सोनारपाडा परिसरात दिराची चाकूने भोसकून हत्या

डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता मेंगाणे या दोघांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते. काल दुपारी देखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी घरात संदीप यांचा भाऊ सागर होता. सागरने हा वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले. या हल्ल्यात सागर जखमी झाला होता, नंतर त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दरम्यान संगीतानेदेखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. संगीतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संगीताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती-पत्नीचा वाद सोडवायला गेलेल्या शेजाऱ्याची हत्या

दुसऱ्या प्रकरणात उसरघर येथील एका बांधकामाच्या साईटवर ताहियाद अली, सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरी करतात. या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली हा वाद सोडवण्यासाठी आला. संतापलेल्या ताहियादने जोहर ला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियाद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -