Saturday, June 21, 2025

Water Shoratge : राज्यात पाण्याची टंचाई! केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Water Shoratge : राज्यात पाण्याची टंचाई! केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा


मुंबई : सध्या राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून पाणी आटत (Water Shortage) चालले आहे. राज्यांतील अनेक गावांत पाणीटंचाईची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी डोक्यावर हंडे, घागरी दिसत आहेत, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरु झाले आहेत. राज्यातील पाणीसाठी हा केवळ २८ टक्के इतका खाली आला आहे. तर मराठवाड्यातील (marathwada) पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.


राज्यातील पाण्याची समस्या गंभीर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत असताना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सध्या जायकवाडीत फक्त ७.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात निम्म्याहून अधिक धरण भरलेलं होतं.



या जिल्ह्यातील धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा


बीड, धाराशीव आणि लातूरमध्ये अनेक छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील धरणसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याचवेळी जलसाठा ३० टक्के होता. दरम्यान, कोयना धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मीतीत देखील घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील ३०.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गंगापूर धरणात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या खाली आहे.



विदर्भातील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा


दरम्यान, विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे विदर्भातील धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूर विभागात जलसाठा ४० टक्क्यांवर तर अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा ४४ टक्क्यांवर आला आहे. तर कोकणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे.

Comments
Add Comment