Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणखोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल...

खोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला या जिल्ह्यात पाठवले. त्यानंतर येथील जनतेने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली. येथील जनतेमुळे आमदार ते मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री अशी विविध पदे मी भूषवू शकलो. लोक प्रेम देतात, आशीर्वाद देतात, कौतुक करतात. जनतेचे हे प्रेम पाहून मी भारावून जातो. त्यामुळेच कोकणी जनतेच्या या प्रेमातून उतराई होण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. मी कोकणची ओळख केवळ राज्यातच नव्हे तर दिल्लीतही केली. मी दिल्लीत असलो तरी माझा लक्ष नेहमीच माझ्या जिल्ह्याकडे व कोकणाकडे असतो. कारण कोकणचे व माझे नाते अतूट आहे. हे नाते कायम जपले जाईल, असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथे आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणी जनतेला साद दिली. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जगाच्या अर्थव्यवस्थेत ११ क्रमांकावर असणारा भारत पाचव्या क्रमांकावर आणला. ते कसे झाले हे उद्धव ठाकरेंना कळणार नाही. तेवढा त्यांचा अभ्यासही नाही. कोरोना काळात जेव्हा मोंदी देशातील जनतेसाठी दिवसरात्र झटत होते. तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसले होते. मोदींनी लस तयार करून जनतेचे प्राण वाचवले तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात आलेल्या औषधाची टेंडर काढण्यासाठी १५ टक्क्यांची मागणी केली. नरेंद्र मोदींनी लस तयार केली. उद्धव- आदित्यनी पैसे मोजले. खोके म्हणून आमदारांना हिणवतात. याच आमदारांनी दिलेल्या खोक्यावर उद्धव ठाकरेंनी मातोश्री – २ बांधला. खोके पेट्या मातोश्रीत कुठून येतात याची सर्व माहिती माझ्याकडे असून वेळ आल्यावर ते बाहेर काढून असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

विजयोत्सव, आंनदोत्सव येथेच साजरा होणार
कोकणी जनतेने नियमित मला प्रेम दिले आहे. यावेळी देखील ते मला नक्कीच आशीर्वाद देतील. विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवीत आहे. मात्र विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी फार सोपी आहे. मात्र, युद्ध आणि निवडणुकीमध्ये विजय मिळेपर्यंत नजर काढायची नसते. युद्धात समोरच्याने शस्त्र खाली ठेवल्याशिवाय थांबायचे नसते. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदानापर्यंत स्वस्थ बसू नये. विजय आपलाच आहे आणि ४ जून नंतर विजयोसव व आनंदोत्सव याच ठिकाणी साजरा करायचा आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जनता आता दिशाभूल करणाऱ्यांना फसणार नाही
कोकणात अनेक विकासकामे मी केली आहेत. रस्ते, वीज, पाणी गावागावात पोहोचवले. विमानतळ पूर्णत्वास आणले. शासनाच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. पण खाजगी स्वरूपातही लोकांना उपयोगी पडणारे उपक्रम राबविले. वडीलांच्या नावाने मी ट्रस्ट सुरू केलं आहे. यातून गंभीर आजार असणारे रूग्ण, शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसणारे विद्यार्थी यांना मोफत मदत केली. इंजीनियरिंग कॉलेज मेडिकल कॉलेजमधून अनेक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. मी एकटा एवढे करू शकतो. मात्र विरोधकांनी या कोकणासाठी काय केले. केवळ कोकणातील जनतेची दिशाभूल करून मते मागायची व पुन्हा पाठ फिरवायची हेच काम यांना केले आहे. मात्र आता जनता त्यांना फसणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -