- कथा : प्रा. देवबा पाटील
यशश्रीकडे रोजच्यासारखी परीताई आल्यानंतर यशश्रीने परीला आधी चहापाणी दिले. मग आपल्या शंका विचारणे सुरू केले.
“परीताई काही तारे स्थिर दिसतात, तर काही चालताना का दिसतात?’’ यशश्रीने आपली शंका बोलून दाखवली.
ताऱ्यांचे भासमानदृष्ट्या स्थिर तारे व अस्थिर तारे असे दोन प्रकार पडतात. जे तारे आपणास एकाच जागी स्थिर दिसतात, ते स्थिर तारे व जे तारे आपणास फिरताना दिसतात, ते अस्थिर तारे असतात. वास्तविक पाहता दोन्हीही प्रकारचे तारे प्रचंड वेगाने अवकाशात भ्रमण करीत असतात; परंतु जे आपणास जवळ असतात, ते आपणास फिरताना दिसतात व जे आपणापासून अत्यंत दूर असतात, त्यांचे भ्रमण आपणास दिसत नाही व ते आपणास स्थिर वाटतात. परीने माहिती दिली.
‘‘जोडतारे कसे असतात?’’ यशश्रीने विचारले.
‘‘आकाशात नेहमी एकमेकांसोबतच जोडीने भ्रमण करणारे जे तारे असतात त्यांना ‘जोडतारे’, ‘जोडतारका’ वा ‘तारकायुगल’सुद्धा म्हणतात. जोडतारे म्हणजे एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने बांधलेले व एकमेकांभोवती म्हणजे त्याच्या सामाईक वस्तुमान-केंद्राभोवती फिरणारे दोन किंवा अधिक तारे. अशा जोडीने सोबत फिरणाऱ्या दोन ताऱ्यांच्या जोडीला ‘द्वैत तारे’ म्हणतात. उदा. सप्तर्षींच्या टोकास अशा जोडतारकांची जोडी दिसते. तीन किंवा तीनपेक्षा अधिक अशा परस्परांभोवती भ्रमण करणाऱ्या जोडताऱ्यांना गुणित तारे म्हणतात. उदा. तुमच्या सूर्याला सर्वांत जवळ असलेला आमचा मित्र तारा हा ताऱ्यांचे त्रिकूट आहे,’’परीने स्पष्टीकरण दिले.
‘‘पृथ्वीपासून ताऱ्यांचे अंतर कसे मोजतात परीताई?’’ यशश्रीने विचारले.
परी म्हणाली की, “आपल्या ग्रहापासून अब्जो मैल दूर असणाऱ्या या ताऱ्यांचे अंतर हे प्रकाशवर्षात मोजतात. प्रतिसेकंद १,८६,००० मैल वेगाने एका वर्षात प्रकाश जेवढे अंतर चालून जातो, त्या अंतरास ‘एक प्रकाशवर्ष’ असे म्हणतात. १ प्रकाशवर्ष अंतर हे ६ हजार अब्ज मैल होते. आपल्या आकाशगंगेतील तुमच्या सूर्याला सर्वात जवळ असणाऱ्या ताऱ्याचे नाव ‘अल्फासेंटॉरी’ हे आहे. तो सूर्यापासून ४.५ प्रकाशवर्षे दूर आहे. तोच आमचा ‘मित्र’ तारा आहे.
ज्यावेळी आपण म्हणतो की, अमूक तारा पृथ्वीपासून ४ प्रकाशवर्षे दूर आहे, तेव्हा आपण पाहत असलेला त्याचा आजचा प्रकाश हा त्या ताऱ्यावरून ४ वर्षांपूर्वीच निघालेला असतो. त्यामुळे पृथ्वीपासून कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या व आज आपणास दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश हा आजचा नसून तो लाखो वर्षांपूर्वीचा असू शकतो. तो तारा आज अस्तित्वात असू शकतो वा कदाचित नसूही शकतो. आपला सूर्य पृथ्वीपासून सव्वाआठ प्रकाश मिनिटे दूर आहे. चंद्र पृथ्वीपासून केवळ सव्वा प्रकाश सेकंद दूर आहे.
इतक्या दूर अंतरावरील ताऱ्यांचा प्रकाश आपणास आजच्या आजच कसा काय दिसू शकतो मग परीताई?” यशश्रीने शंका काढली.
“आपणास आज रात्री ताऱ्यांचा जो प्रकाश दिसतो, तो त्या ताऱ्यापासून त्याचे अंतर आपल्या ग्रहापासून जेवढे प्रकाशवर्षे दूर आहे, तेवढ्या अंतराइतकी वर्षे अगोदर निघालेला असतो. सूर्य पृथ्वीपासून फक्त सव्वाआठ मिनिटे प्रकाशवर्ष एवढाच दूर आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत केवळ सव्वाआठ मिनिटांतच पोहोचतो. प्रकाशाला वहनासाठी माध्यमाची गरज नसते; परंतु आपल्या ग्रहापासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्यांपासून निघालेला प्रकाश जो आज आपण पाहतो, तो तेवढ्या अंतराइतका आधी त्या ताऱ्यापासून निघालेला असतो. त्यामुळे ते तारे आज तेथे अस्तित्वात असतील किंवा नष्ट झाले असतील हे आपणास आज कळूच शकत नाही. त्याचा प्रकाश जेव्हा दिसणार नाही, तेव्हा तो तारा नष्ट झाला, असे आपण समजू. आपल्याला हे कळायलाही आणखी हजारो वर्षे लागतील.’’ परीने स्पष्टीकरण दिले.
‘‘आपणास आकाशात सारे तारे हे बिंदूसारखे का दिसतात?’’ यशश्रीने प्रश्न केला.
“प्रत्यक्षात तारे हे आकाराने खूप मोठे असतात; परंतु ते आपल्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत म्हणून ते आपणास बिंदूसारखे दिसतात. तसेच प्रत्येक चमकणारा तारा हा एक बिंदू म्हणजे एकच तारा आहे, असे आपणास वाटते; परंतु काही ताऱ्यांच्या शेजारी दुसरा तारासुद्धा असतो. वास्तविकत: ते एकमेकांच्या जवळ असलेले तारे प्रत्यक्षात परस्परांपासून खूप दूर असतात; परंतु ते आपल्यापासूनही अतिशय दूर असल्याने, ते आपणास साध्या डोळ्यांनी एकच असल्याचे वाटतात. शक्तिशाली मोठ्या दुर्बिणीतून ते वेगवेगळे दिसतात.” परीने सांगितले.
‘‘परीताई, आज मला शाळेचा थोडासा अभ्यास करावयाचा आहे, तरी ताई तू उद्या येशील का?’’ यशश्रीने विचारले. ‘‘हो गं. ही माहिती पूर्ण होईपर्यंत मी रोज तुझ्याकडे येत जाईल.’’ परी म्हणाली, तसा यशश्रीला आनंद झाला. “धन्यवाद ताई.” यशश्रीने परीचे आभार मानून निघून गेली.